भारतातील सध्याचे वातावरण प्रचंड दहशतवादी - श्रीपाल सबनीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 10:27 AM2022-04-18T10:27:47+5:302022-04-18T10:43:28+5:30
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी अध्यक्षस्थानाहून सबनीस बोलत हाते.
नागपूर : वर्तमानातील भारतीय वातावरण हे अतिशय हिंसक असून, जगाला हिंसेने ग्रासले आहे. युक्रेन मरतोय, माणसे मारली जात आहेत, रक्त सांडले जात आहे. हे साहित्यिकांना अपेक्षित नसल्याचे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी रविवारी येथे केले.
मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या वतीने धनवटे नॅशनल कॉलेज येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित पहिल्या राज्यस्तरीय मायमराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी रविवारी अध्यक्षस्थानाहून सबनीस बोलत हाते. संमेलनाचे उद्घाटन माजी कृषिमंत्री व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष हेमंत काळमेघ, साहित्यिक डॉ. शोभा रोकडे, मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर, सचिव मंगेश बावसे, उपाध्यक्ष विशाल देवतळे, धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे.डी. वडते, प्राचार्य महेंद्र ढोरे, मराठी विभाग प्रमुख डॉ. भारती खापेकर आदी उपस्थित होते.
सध्या भोंग्यांचे राजकारण तापत आहे. मात्र, साहित्यिकांनी हे लक्षात ठेवावे की राजकारण्यांचा भोंगा सत्तेचा असेल तर साहित्याचा भोंगा हा सत्याचाच असला पाहिजे. जगात बायडेन, पुतीन, जेलेन्स्की यांचे वेगवेगळे गट आहेत. मात्र, शेक्सपिअर, ज्ञानेश्वर, तुकाराम हे कोणत्याही गटाचे नाहीत, ते साऱ्या जगाचे नायक आहेत. तिसऱ्या विश्वयुद्धाची ठिणगी कधीही पडेल. त्या पार्श्वभूमीवर सत्याचा शोध घेण्याची भूमिका अशा संमेलनातून प्रसारित व्हायला हवी. वैज्ञानिक हे प्रतिभावंत आहेत. मात्र, ते नव्या हिटलरच्या हातात जीवघेणी हत्यारे सोपवीत आहेत. ते माणुसकीचे मारेकरी झाले असून, त्यांच्यासारखा हा कृतघ्नपणा जगाच्या इतिहासात कधीही झालेला नसल्याचे डॉ. श्रीपाल सबनीस यावेळी म्हणाले. याप्रसंगी कादंबरीकार शेषराव शंकरराव खाडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विजया मारोतकर, चरणदास वैरागडे, आनंदी चौधरी, मंगेश बावसे, अरुणा कडू, पल्लवी उमरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश बावसे व विकास गजापुरे यांनी केले, तर आभार विशाल देवतळे यांनी मानले.
घरात पैशाची नको, पुस्तकांची श्रीमंती असावी - शोभा रोकडे
आपल्या घरात पैशाची श्रीमंती नसेल तरी चालेल. मात्र, पुस्तकांची श्रीमंती असावी. महिलांनी साड्यांचे, चपलांचे कपाट खूप तयार केले. मात्र, त्यात पुस्तकांचेही कपाट असावे, असे आवाहन डॉ. शोभा रोकडे यांनी यावेळी केले.
साहित्य संमेलने कंटाळवाणे - हर्षवर्धन देशमुख
साहित्य संमेलने ही कंटाळवाणे होत असतील तर त्यात आम्ही कशाला यावे, असा प्रश्न पडतो आहे. याचा विचार आयोजकांनी करणे अपेक्षित असून, वर्तमानात इंग्रजी ही ज्ञानाची व व्यवहाराची भाषा असली तरी मायमराठी विसरून चालणार नाही, अशी भावना माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.