ज्येष्ठ संघ स्वयंसेवक श्रीराम जोशी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 07:57 PM2020-03-04T19:57:37+5:302020-03-04T19:58:04+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विदर्भ प्रांताचे माजी सहसंघचालक श्रीराम शंकर जोशी (८५) यांचे निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व विदर्भ प्रांताचे माजी सहसंघचालक श्रीराम शंकर जोशी (८५) यांचे निधन झाले. धरमपेठ येथे राहत्या घरी त्यांनी अंतिम श्वास घेतला. संघ वर्तुळात त्यांचा दांडगा संपर्क होता व जवळपास सर्वच सरसंघचालकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले होते. जोशी यांच्या निधनामुळे संघ वर्तुळात शोककळा पसरली होती.
श्रीराम जोशी हे विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग’चे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले होते. संघाशी ते लहानपणीच जुळले होते. शिशु स्वयंसेवकापासून त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.
द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींपासून ते अगदी विद्यमान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला होता. याशिवाय ते सामाजिक वर्तुळातदेखील सक्रिय होते व विविध सामाजिक संस्थांशी जुळले होते. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात भाऊ लक्ष्मण, वहिनी, तीन मुले, सून व नातवंडे आहेत.
श्रीरामजी समर्पित स्वयंसेवक होते : गडकरी
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी श्रीराम जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत संघकार्य पोहोचविण्यासाठी श्रीराम जोशी यांनी अव्याहत मेहनत केली. कार्यकर्ता घडविण्याची त्यांची हातोटी, त्यांची शिस्त, समाजाप्रति असलेले समर्पण कायमच सर्वांना प्रेरणा देत राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.
श्रीराम जोशींनी निष्ठावंत स्वयंसेवक घडविले : पुरोहित
डॉ.श्रीराम जोशी हे व्यवसायाने शिक्षक व अनेकांच्या आयुष्याला दिशा देणारे गुरू होते. स्वयंसेवकांमध्ये ते लोकप्रिय होते. शांत स्वभाव व संयमित व्यक्तिमत्त्वामुळे लोक त्यांच्याशी जोडले जात. त्यांनी अनेक निष्ठावंत स्वयंसेवक घडविले. त्यांच्याशी माझा काही दशकांपासून परिचय होता व त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले. त्यांच्या निधनामुळे माझे वैयक्तिक नुकसानदेखील झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना.
-बनवारीलाल पुरोहित, राज्यपाल, तामिळनाडू