श्रीराम मंदिर भूमीपूजन; सरसंघचालक अयोध्येकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 10:40 AM2020-08-04T10:40:33+5:302020-08-04T10:41:17+5:30
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत सोमवारी अयोध्येकडे रवाना झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची या ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरसंघचालक सोमवारी अयोध्येकडे रवाना झाले.
‘कोरोना’ प्रकोपामुळे अयोध्येतील कार्यक्रमात निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. अयोध्येतदेखील मंदिराशी संबंधित लोक ‘कोरोना’बाधित झाल्यामुळे सरसंघचालक जाणार की नाही याबाबत विविध अफवा पसरविण्यात येत होत्या. मात्र ते कार्यक्रमात सहभागी होणार असे संघ पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. सोमवारी सरसंघचालक नागपुरातून अयोध्येकडे निघाले. इटारसीपर्यंत ते रस्तेमार्गाने गेले. त्यानंतर रेल्वेने अयोध्येकडे प्रवास सुरू केला. अंजनगाव सुर्जी येथील श्रीदेवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनादेखील अयोध्येतील कार्यक्रमाचे निमंत्रण आले आहे. तेदेखील रविवारीच रस्तेमार्गाने अयोध्येकडे रवाना झाले.