श्रीरामजन्मोत्सव; प्रणाम स्वीकारा श्रीरामा हा अमुचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:32 PM2020-04-02T20:32:27+5:302020-04-02T20:39:31+5:30

नागपूरकरांनी श्रीरामजन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत विनयशिल शैलित साजरा केला. हा सोहळा साजरा करताना भक्तांच्या मनात अपराधबोध होता तो हा की ‘हे राम तेरे द्वार मैं कैसे आऊ’ या भावनेचा.

Shriramnavami, accept our feelings | श्रीरामजन्मोत्सव; प्रणाम स्वीकारा श्रीरामा हा अमुचा!

श्रीरामजन्मोत्सव; प्रणाम स्वीकारा श्रीरामा हा अमुचा!

googlenewsNext
ठळक मुद्देदीप उजळले, धुप पसरले, अंगाईगीताने स्वागत झालेसामाजिक दायित्त्वाचे वहन करत भक्तांनी घडविला इतिहास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री राम चरित्रवान होते, मर्यादापुरुषोत्तम होते, महापराक्रमी-संयमी होते, विनयशिल होते. एका अर्थाने सर्वगुणसंपन्न असा आदर्शाचा सजिव पुतळा म्हणजेच श्रीराम. शत्रूच्या पराक्रमाचा, त्याच्या शौर्याचा सन्मान ठेवणारा हा राजा या भारतभूला लाभला, हे भारतीयांचे भाग्यच म्हणावे लागेल आणि त्याच तत्त्वांचा जागर करत नागपूरकरांनी श्रीरामजन्मोत्सवाचा सोहळा अत्यंत विनयशिल शैलित साजरा केला. हा सोहळा साजरा करताना भक्तांच्या मनात अपराधबोध होता तो हा की ‘हे राम तेरे द्वार मैं कैसे आऊ’ या भावनेचा. मी आलो तर दुसरा येईल, दुसरा आला तर तिसरा येईल आणि असे करता करता सारा समाज गोळा होईल आणि ‘लॉकडाऊन’ तुटल्यामुळे तुझ्या राज्यातील प्रजेचा सत्यानाश होईल. शत्रुचा हैदोस माजतो तेव्हा कर्तव्यदक्ष प्रजेने अस्त्र-शस्त्र सज्ज होऊन रणांगण गाजवावे लागते. शत्रूच्या प्रवृत्तीनुसार युद्धाचे नियोजन आखावे लागते. कोरोना नावाचा शत्रू कुटील आहे, षडयंत्रकारी आहे. त्यामुळेच त्याचा निप्पात त्याच्याच शैलित करावा लागेल, या कर्तव्यभावनेचा जागर भक्तांनी केला आणि सामाजिक विलगीकरणाच्या प्रक्रीयेला, संचारबंदीला तडा न जाऊ देता भक्तांनी आपापल्या घरीच श्रीरामजन्मोत्सव सोहळा साजरा केला.
चैत्र शुद्ध नवमीला अवघ्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामाचंद्राचा जन्मदिवस. हा दिवस श्रीरामनवमी म्हणून साजरा केला जातो. नागपुरात तर देशातील सर्वात मोठी श्रीरामजन्मोत्सव शोभायात्रा काढली जाते आणि त्याचा साक्षात्कार घेण्यासाठी खुद्द अयोध्यावासीही दरवर्षी नागपुरात हजर होत असतात. मात्र, यंदा कोरोना विषाणू नावाच्या अतिसुक्षम दैत्याच्या प्रादुर्भावाने शहराच्या सर्वात मोठ्या उत्सवावर विरजण टाकले आहे. पोद्दारेश्वर राम मंदिरातर्फे दरवर्षी काढण्यात येत असलेल्या श्रीरामजन्मोत्सव सोहळा शोभायात्रा यंदा स्थगित झाली. गेल्या ५४ वर्षाच्या काळात प्रथमच ही शोभायात्रा स्थगित झाली. कोरोना नावाच्या महामारीवर विजय प्रस्थापित करण्यासाठीची योजना म्हणून ही शोभायात्रा स्थगित झाली. आणि या अतिउदात्त हेतूला भक्तांनीही उदंड प्रतिसाद देत आपल्या सामाजिक दायित्त्वाचे वहनही केले. हिच स्थिती पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने रामनगर येथील श्रीराममंदिरातून दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रेचीही होती.
-----------
बॉक्स...
पोद्दारेश्वर राम मंदिरात कुलुपबंद सोहळा
: शहरातील अतिविख्यात असलेल्या पोद्दारेश्वर राममंदिरात श्रीरामजन्मोत्सव सोहळा साजरा झाला. कोरोनाची बाधा टाळण्यासाठी नाईलाजाने आणि निराश भावनेने व्यवस्थापन समितीने मंदिर सकाळपासूनच कुलुपबंद ठेवले होते. आतमधील पुजारी व व्यवस्थापकीय मंडळातील सदस्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळत श्रीरामाचा जन्म साजरा करण्यात आला. मंदिराबाहेर भाविक रामाच्या दर्शनासाठी येत होते. द्वारावरच दिलेला ‘सजग’ राहण्याचा इशारा वाचून द्वाराचेच पुजन करून परतत होते.

पाणावलेल्या डोळ्यांनी होत होते पुजन
: श्रीरामजन्मोत्सव सोहळा घरी साजरा करणे आणि देवळात जाऊन रामाचे दर्शन घेण्याची फार जुनी परंपरा आहे. रामनवमीला अवघे शहर राममय झाले असते आणि संपूर्ण शहर, हिंदू-मुस्लिमांसोबतच वेगवेगळे पंथीयही या सोहळ्यात सहभागी होत असतात. अनेकांच्या आठवणी या सोहळ्याशी, परपंपरेशी जुळल्या आहेत. आजवर कितीही कठीण व कठोर प्रसंग आले तरी सोहळा स्थगित झाला नव्हता की मंदिराचे कपाट बंद झाले नव्हते. मात्र, कोरोनाच्या प्रकोपामुळे नागरिकांच्या आयुष्याची सुरक्षा म्हणून प्रथमच कपाटे बंद होती आणि दर्शन घेता येत नव्हते. यामुळे अनेक संवेदनशिल भक्तांच्या डोळ्यात अश्रू तराळले होते. पाणावल्या डोळ्यांनी ते कपाटाचेच पुजन करून मागे वळत होते.

कोरोना वायरस का अंत करो राम!
: पोद्दारेश्वर राम मंदिराचे कपाट बंद होते आणि भाविकांना बाहेरूनच परत फिरण्याची विनंती करणारे पत्र कपाटला चिकटवण्यात आले होते. सोबत सामाजिक संदेश देणारी रांगोळी लक्षवेधक ठरत होते. ‘कोरोना वायरस का अंत करो राम’ अशा ओळींची ही रांगोळी भाविकांच्या आर्त भावना व्यक्त करत होती.
 

Web Title: Shriramnavami, accept our feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.