श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंटच्या समीर जोशीला १० महिन्याचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 08:50 PM2019-03-26T20:50:33+5:302019-03-26T20:51:58+5:30
विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा समीर जोशी याला १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास ४५ दिवसामध्ये २ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश दिला. न्यायाधीश शीतल कौल यांनी हा निर्णय दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा समीर जोशी याला १० महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास ४५ दिवसामध्ये २ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश दिला. न्यायाधीश शीतल कौल यांनी हा निर्णय दिला.
नीलकंठ घायवट असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते रघुजीनगर येथील रहिवासी आहेत. जोशी गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या योजनांमध्ये मोठमोठ्या ठेवी स्वीकारत होता. अशाप्रकारे त्याने शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केली. जोशीच्या जाळ्यात फसून घायवट यांनी १० जुलै २०१२ रोजी श्रीसूर्या कंपनीत एक लाख रुपये गुंतवले होते. त्यानंतर त्यांना १० जुलै २०१४ रोजी शिक्षक सहकारी बँक सीताबर्डी शाखेचा एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला होता. तो धनादेश बँक खाते बंद करण्यात आल्याच्या कारणावरून परत आला. त्यामुळे घायवट यांनी ३० जुलै २०१४ रोजी जोशीला कायदेशीर नोटीस बजावली. परंतु, जोशीने नोटीसची दखल घेतली नाही. परिणामी, घायवट यांनी विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. तक्रारकर्त्यातर्फे अॅड. बी. बी. चौधरी यांनी कामकाज पाहिले.