शुभांगी भिवगडे, स्मिता आंबिलडुकेला अटकपूर्व जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:12 AM2021-09-08T04:12:36+5:302021-09-08T04:12:36+5:30
नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा नवजात बाळांचा मृत्यू झाल्यामुळे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या परिचारिका ...
नागपूर : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा नवजात बाळांचा मृत्यू झाल्यामुळे दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्या परिचारिका शुभांगी रामकुमार भिवगडे (साठवणे) व स्मिता संजयकुमार आंबिलडुके (मासुळकर) यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी दोन्ही परिचारिकांचा यासंदर्भातील अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावला.
देशभरात गाजलेली ही हृदयद्रावक घटना ९ जानेवारी २०२१ रोजी पहाटे घडली होती. संबंधित नवजात बालके आयसीयूमध्ये भरती होती. घटनेच्या चौकशीमध्ये या दोघींसह ज्योती बारसागडे या परिचारिकेने सेवेत निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले. परिणामी, त्यांच्याविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. गेल्या ३ ऑगस्ट रोजी भंडारा सत्र न्यायालयाने बारसागडेला अटकपूर्व जामीन मंजूर केला, पण भिवगडे व आंबिलडुकेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
------------------
११ मिनिटे स्पार्किंग झाले
नवजात बालके भरती असलेल्या वॉर्डात ११ मिनिटे स्पार्किंग होत होते हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आरोपी परिचारिकांवर या वॉर्डाकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. परंतु, त्यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे ही घटना लगेच लक्षात येऊ शकली नाही. परिणामी, दहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. ही घटना समाजमन हेलावून गेली. करिता, दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी करण्याची गरज आहे, असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले.