श्वेता भट्टडने स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेतले
By Admin | Published: February 8, 2016 03:11 AM2016-02-08T03:11:32+5:302016-02-08T03:11:32+5:30
श्वेता भट्टड यांनी जनमंचच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या व्यथांकडे वेधले लक्ष : तिसऱ्यांदा केला प्रयोग
नागपूर : श्वेता भट्टड यांनी जनमंचच्या शेतकरी मेळाव्यादरम्यान स्वत:ला तीन तास जमिनीत पुरून घेत शेतकऱ्यांच्या व्यथांकडे लक्ष वेधले.
श्वेता भट्टड या नागपुरातील प्रसिद्ध परफॉर्मर्स आर्टिस्ट आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्या स्वत:ला जमिनीत पुरून घेतात. हा त्यांचा तिसरा प्रयोग होता. यापूर्वी त्यांनी पुणे आणि पॅरिसमध्ये असा यशस्वी प्रयोग सादर केला आहे. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पांढरे कपडे घालून त्यांनी स्वत:ला शवपेटीमध्ये बंद केले. ते संपूर्ण शवपेटी नंतर जमिनीत पुरण्यात आली. यासाठी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहातील पार्किंग परिसरात एक खड्डा तयार करण्यात आला होता. ही एक विशिष्ट प्रकारची शवपेटी होती. त्यात कॅमेऱ्याची सुविधा होती. त्यामुळे आत काय सुरू आहे, हे बाहेर असलेल्यांना एलसीडीवर पाहता येत होते. तीन तास त्या या शवपेटीसह जमिनीत होत्या. यादरम्यान श्वेता भट्टड या शवपेटीमध्ये झोपल्या नव्हत्या तर त्या एका बुकमध्ये विश्वास, विश्वास असे लिहित होत्या. ४ वाजून ३० मिनिटांनी जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आले तेव्हासुद्धा त्या लिहीतच होत्या. त्यांना जमिनीत पुरताना आणि बाहेर काढताना शेतकऱ्यांसह उपस्थितांनी मोठी गर्दी होती. श्वेता बाहेर येताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. अभिनंदनाचा वर्षाव केला.
तीन डॉक्टरांची चमू ठेवून होती लक्ष
श्वेता भट्टड यांच्या या प्रयोगासाठी दंदे हॉस्पिटलने विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. स्वत: डॉ. पिनाक दंदे यांच्यासह डॉ. सुलभ शर्मा, डॉ. रितेश यांची चमू श्वेता यांच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांना आॅक्सिजन व्यवस्थित मिळत आहे का, त्यांच्या हृदयाचे ठोके आदी सर्वांवर डॉक्टरांचे लक्ष होते. यासाठी आयसीयू फॅसिलिटी उपलब्ध होती.
जनमंचतर्फे स्वागत
तीन तस जमिनीत घालवून परत आल्यानंतर श्वेता भट्टड यांचे जनमंचतर्फे व्यासपीठावर स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ. शरद निंबाळकर, ई.झेड. खोब्रागडे, अॅड. अनिल किलोर, प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, डॉ. पिनाक दंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
सर्वांनी एकजूट व्हा - श्वेता भट्टड
तुम्ही सर्वांनी एकजूट होऊन स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करावी, असे आव्हान श्वेता भट्टड यांनी यावेळी केले. जमिनीत स्वत:ला पुरण्यापूर्वी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी मी हा प्रयोग करीत आहे. हे करीत असतांना आपल्याला भीती वाटत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विश्वासावरच सर्व अवलंबून असते असे स्पष्ट करीत आत आपण विश्वास असे लिहित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गर्व आहे,
पण भीती वाटतेच
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपली मुलगी हा प्रयोग करते. त्यात तिला मान सन्मानही मिळतो याबाबत गर्व वाटतो. परंतु ती हा जीवघेणा प्रयोग करते, तेव्हा आई म्हणून भीती तर वाटतेच.
उषा भट्टड, श्वेताची आई