गृहमंत्र्यांना भेटणार, पोलिसांच्या उत्तरानंतर अंनिसची भूमिका; बागेश्वर बाबांचा वाद कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 05:53 PM2023-01-25T17:53:08+5:302023-01-25T18:01:17+5:30
पोलिसांकडून मिळालेल्या उत्तरानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.
नागपूर - दिव्य दरबारवरून चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण महाराज यांना नागपूरपोलिसांनी ‘क्लीन चिट’ दिली आहे. नागपुरात झालेल्या त्यांच्या कार्यक्रमादरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ चे कुठेही उल्लंघन झालेले नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. नागपूर पोलिसांनी संपूर्ण व्हिडीओजची तपासणीही केली होती. पोलिसांकडून मिळालेल्या उत्तरानंतर अंनिसचे श्याम मानव यांनी आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांकडून जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांचे दावे खोडले गेल्याने त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, श्याम मानव यांनी आता थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच दाद मागणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच, याप्रकरणी गुन्हाही दाखल होऊ शकतो, यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासणार असल्याचंही ते म्हणाले.
याप्रकरणी पूर्णतः कायद्याचं उल्लंघन झाला असताना पोलिसानी नकार दिला आहे. जर कोणी देवाच्या नावावर आश्वासन देत असेल तर अशा प्रकारचं आश्वासनसुद्धा देणं या जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे, असे श्याम मानव यांनी म्हटले. तसेच, पोलिसांवर कुणाचातरी दबाव असल्याचे सांगत, आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटणार. त्यानंतरच, कोर्टाच्या प्रक्रिये बद्दल ठरवणार असल्याचंही श्याम मानव यांनी सांगितले.
धीरेंद्र शास्त्रींविरुद्ध अमरावतीत आंदोलन
देशभरात धिरेंद्र शास्त्री महाराजांचे नाव चांगलेच चर्चेत आले असताना, त्यांच्या नागपूर येथील कार्यक्रमानंतर अंनिसने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आता धिरेंद्र शास्त्रींकडे संशयाच्या भूमिकेतून बघितल जातंय. त्यातच, छत्रपती सेनेच्यावतीने अमरावतीमध्ये धिरेंद्र शास्त्रींच्या अटकेच्या मागणीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सोबतच धिरेंद्र शास्त्रींनी आमच्या 21 लोकांच्या एटीएमचे पासवर्ड सांगितल्यास त्यांना 21 लाखांचे इनाम देण्याची घोषणाही करण्यात आली.