आजारी पतीला पत्नीनेच लुटले, बँक खात्यातून चुपचाप ६.७३ लाख पळवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 04:51 PM2022-01-12T16:51:23+5:302022-01-12T16:54:10+5:30
खांद्याचे ऑपरेशन झाल्याने गाेंडाणे रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. याच वेळेचा फायदा उचलत पत्नीने त्यांच्या बँक खात्यातून ६.७३ लाख रुपयांची उचल केली.
नागपूर : सेवानिवृत्त पती आजारी असल्याचा फायदा घेत पत्नीने अन्य दाेघांच्या मदतीने त्यांच्या बँक खात्यातील ६ लाख ७३ हजार ८८ रुपयांची उचल करीत ती संपूर्ण रक्कम तिघांच्या बँक खात्यात जमा करीत पतीची फसवणूक केली. या प्रकरणात तिघांविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला असून, यात दाेन महिलांचा समावेश आहे. ही घटना बुटीबाेरी (ता. नागपूर ग्रामीण) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बाेरखेडी येथे नुकतीच उघडकीस आली.
आराेपींमध्ये सिद्धार्थ रामराव गाेंडाणे यांच्या पत्नीसह अन्य एक महिला व टाेनी थॅमस जाेसेफ या तिघांचा समावेश आहे. सिद्धार्थ गाेंडाणे (६२, रा. बाेरखेडी, ता. नागपूर ग्रामीण) हे दाेन वर्षांपूर्वी रेल्वे विभागातून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर ते पत्नीसाेबत बाेरखेडी येथे राहू लागले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांच्या बँक खात्यात एकूण २२ लाख रुपये हाेते. यातील १५ लाख रुपयांची त्यांनी एफडी (फिक्स डिपाॅझिट) केल्याने त्यांच्या खात्यात सात लाख रुपये शिल्लक राहिले हाेते.
दरम्यान, एप्रिल २०२१ मध्ये त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन झाले. त्यामुळे ते सप्टेंबर २०२१ मध्ये रुग्णालयात भरती हाेते. या काळात त्यांची बँकेची सर्व कागदपत्रे घरी हाेती. काही दिवसांपूर्वी त्यांनी बँकेत जाऊन विचारपूस केली असता, त्यांच्या खात्यात केवळ २६ हजार ९१२ रुपये शिल्लक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
या प्रकाराची त्यांनी चाैकशी केली असता, त्यांची पत्नी, एक अन्य महिला आणि टाेनी थाॅमस जाेसेफ या तिघांनी संगनमत करून त्यांच्या खात्यातून बँक खात्यातून ६ लाख ७३ हजार ८८ रुपयांची उचल करीत रक्कम आपापल्या खात्यात जमा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी पाेलिसात धाव घेतली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणात पाेलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही किंवा चाैकशीसाठी ताब्यात घेतले नाही.