सिकलसेल जनजागृती सप्ताह; पूर्व विदर्भात सर्वाधिक पीडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2021 07:00 AM2021-12-11T07:00:00+5:302021-12-11T07:00:06+5:30

Nagpur News राज्यात २ लाख ९ हजार ६८४ सिकलसेल वाहक असून यातील एकट्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ६२ टक्के म्हणजे १ लाख ३१ हजार ३१ सिकलसेल वाहक आहेत.

Sickle Cell Awareness Week; Most affected in East Vidarbha | सिकलसेल जनजागृती सप्ताह; पूर्व विदर्भात सर्वाधिक पीडित

सिकलसेल जनजागृती सप्ताह; पूर्व विदर्भात सर्वाधिक पीडित

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात १६६७४ पीडित, २,०९,६८४ वाहकनिर्मूलनावर कोट्यवधी खर्च, तरी दरवर्षी ६ हजार सिकलसेलपीडितांचा जन्म


 

सुमेध वाघमारे

नागपूर : २०११च्या जनगणनेनुसार भारतात एकूण १.८० कोटी सिकलसेल वाहक आहेत. तसेच १४ लाख सिकलसेलपीडित आहेत. महाराष्ट्रात १६ हजार ६७४ पीडित तर, २ लाख ९ हजार ६८४ वाहक आहेत. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणाऱ्या या आजाराच्या निर्मूलनावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना, दरवर्षी जवळपास ६ हजार सिकलसेलपीडित जन्म घेतात. यामुळे निधीच्या खर्चावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

-सिकलसेल हा आनुवंशिक रक्तदोष

सिकलसेल हा आनुवंशिक रक्तदोष आहे. यावर अद्यापही निश्चित उपाय नाही. आई-वडिलांकडून मुलांना नकळत दिला जाणारा हा आजार आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, सिकलसेल ॲनिमियाची माहिती नसणे. सिकलसेलचे प्रमाण वंचित घटकांमध्ये खूप जास्त दिसून येते. सिकलसेल एका विशिष्ट भौगोलिक पट्ट्यात आफिक्रेच्या आदिवासीपासून सुरू होऊन ते भारतातील विदर्भ, कोकण, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, निलगिरी परिसर असा सर्वत्र पसरला आहे.

काय आहे सिकलेसल?

आई-वडिलांच्या रक्तातील लाल रंगाच्या (आरबीसी) कोशिकांमधून येणाऱ्या आनुवंशिक जडणातून मुलांमध्ये याचा प्रसार होतो. रक्तातील लाल कोशिका सामान्यपणे गोल डिस्कसारख्या शरीरात प्रवाहित होत असतात. या लाल कोशिकांचे मुख्य कार्य फुप्फुसातून शरीराच्या प्रत्येक भागाला प्राणवायू पोहोचविण्याचे असते. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक भागाची कार्यप्रणाली अगदी व्यवस्थित सुरू असते. या रक्तकोशिकेच्या जडणात रक्तकणिका हिमोग्लोबीनमध्ये रूपांतरित होते तेव्हा या कोशिकेचा आकार बदलून विळ्याच्या आकाराचा होतो. इंग्रजीत विळ्याला ‘सिकल’ असे व पेशींना ‘सेल’ असे म्हणतात. म्हणून या आजाराचे नाव सिकलसेल पडले.

सिकलसेलचे दोन मुख्य प्रकार

सिकलसेल आजाराचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. सिकलसेल वाहक (एएस) व सिकलसेलपीडित (एसएस). सिकलसेल वाहकाला रक्तात ५० टक्के सिकल कोशिका असून ५० टक्के नॉर्मल कोशिका असतात. त्यामुळे तो सामान्य व्यक्तीसारखा जीवन जगू शकतो. मात्र संबंधिताला कोणताही त्रास होत नसल्याने सिकलसेलची चाचणी करून घेत नाही आणि येथेच धोका होतो. त्याने जर दुसऱ्या सिकलसेल वाहकाशी लग्न केले तर होणारी संतती ही सिकलसेलपीडित होण्याची शक्यता असते. म्हणून विवाहापूर्वी रक्ताची तपासणी करणे गरजेची ठरते.

राज्यात एकट्या पूर्व विदर्भात ६२ टक्के सिलसेलबाधित

राज्यात २ लाख ९ हजार ६८४ सिकलसेल वाहक असून यातील एकट्या पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ६२ टक्के म्हणजे १ लाख ३१ हजार ३१ सिकलसेल वाहक आहेत. सर्वाधिक वाहक चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. यात २७६० पीडित तर ३२८७२ वाहक आहेत. गडचिरोली जिल्ह्यात २४७५ पीडित तर ३२८६० वाहक, नागपूर जिल्ह्यात १६०६ पीडित तर २६८८४ वाहक, गोंदिया जिल्ह्यात १२०३ पीडित तर १२०६३ वाहक, वर्धा जिल्ह्यात १०६३ पीडित तर १३३३५ वाहक तर भंडारा जिल्ह्यात ७११ वाहक तर १३०१७ पीडित आहेत.

राज्यातील सिकलसेलबाधितांची स्थिती

जिल्हा : पीडित : वाहक

ठाणे : ४४० : ४८१४

पालघर : ६३३ : ६३४१

नाशिक : २२२ : १६९१

नंदुरबार : ७१८ : ४३६०

अमरावती : १३१७ : १२००९

गोंदिया : १२०३ : १२०६३

गडचिरोली : २४७५ : ३२८६०

नागपूर : १६०६ : २६८८४

वर्धा : १०६३ : १३३३५

चंद्रपूर : २७३० : ३२८७२

भंडारा : ७११ : १३०१७

यवतमाळ : १३९३ : २७०९७

धुळे : ८९३ : ७७८९

जळगाव : २९८ : ३७४८

नांदेड : १४५ : १४२८

वाशिम : १६३ : १७७०

अकोला : २२२ : ४४६५

बुलडाणा : २७० : १५७९

औरंगाबाद : ५१ : ३४८

रायगड : ३८ : ३२९

हिंगोली : ९३ : ८८५

Web Title: Sickle Cell Awareness Week; Most affected in East Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य