सिकल सेल, थॅलेसेमियाग्रस्त बालकही लसीकरणासाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 01:00 PM2022-01-21T13:00:19+5:302022-01-21T13:08:40+5:30
तिसऱ्या लाटेमध्ये सामान्य नागरिकांसाठी ओमायक्राॅन हा सामान्य व्हेरिएंट वाटत असला तरी कॅन्सर, सिकल सेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ओमायक्राॅन हा डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे जीवघेणा ठरू शकताे.
मेहा शर्मा
नागपूर : तिसऱ्या लाटेमध्ये सामान्य नागरिकांसाठी ओमायक्राॅन हा सामान्य व्हेरिएंट वाटत असला तरी कॅन्सर, सिकल सेल आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी ओमायक्राॅन हा डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे जीवघेणा ठरू शकताे. सिकल सेलच्या रुग्णांसाठी सामान्य व्हायरल तापही घातक ठरणारा असताे. थॅलेसेमिया रुग्णांना वारंवार रक्त द्यावे लागते. त्यामुळे त्यांना संक्रमण झाले तर ते शरीरात वेगाने पसरेल. त्यामुळे या रुग्णांना एका विशेष श्रेणीत ठेवून लसीकरण करण्यात यावे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
सिकल सेल किंवा थॅलेसेमियाच्या रुग्णांना ६० पेक्षा अधिक वर्षे जगणे कठीण असते. त्यामुळे सरकारने त्यांना बूस्टर डाेस द्यावा आणि सर्व वयाेगटातील मुलांना लसीकरण करणे महत्त्वाचे आहे. सिकल सेलमध्ये सिकलिंग प्रक्रियेमुळे अवयवांना नुकसान हाेते. या स्थितीत काेराेनाचे संक्रमण झाले तर त्यांची स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. लाल रक्त पेशींच्या (आरबीसी) सिकलिंगमुळे ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते आणि अवयवांना त्रास हाेताे. अशावेळी एखादा आजार झाला तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काेराेना संक्रमणाला सहजपणे घेऊ नये. संक्रमित झाल्याचे लक्षात आल्यास डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. काही गुंतागुंत वाढत असल्याचे समजल्यास रुग्णालयात भरती हाेणे याेग्य ठरेल.
वारंवार रुग्णालयात जावे लागत असल्याने या रुग्णांना संक्रमणाचा धाेका असताे. या रुग्णांना सतर्कता बाळगणे आवश्यक असते. सिकल सेलच्या रुग्णांना चांगले ऑक्सिडेशन, हायड्रेशन आणि रक्त पुरवठ्याची गरज असते. सध्याच्या काळात स्टेम सेल बॅंकिंग लाेकप्रिय ठरत आहे. अनेक लाेक आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी माेठा पैसा खर्च करतात. मात्र, एखाद्या व्यक्तीचे स्वत:चे स्टेमसेल त्याला सिकल सेलपासून बरे हाेण्यास मदत करत नाही, पण दुसऱ्या व्यक्तीचे स्टेमसेल लाभदायक ठरू शकते. कम्युनिटी स्टेम सेल बॅंकिंग या दिशेने यशस्वी उपाय ठरत आहे.