चाळण टळली, नवीन एकही बोअरवेल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:07 AM2021-07-19T04:07:43+5:302021-07-19T04:07:43+5:30
नागपूर : भूजल सर्वेक्षण विभागाच्या २०१९-२० च्या मूल्यांकनाच्या अहवालावरून राज्यातील १८ तालुके भूजलाच्या अतिउपस्यामुळे डार्क झोनमध्ये आल्याने चिंता वाढली ...
नागपूर : भूजल सर्वेक्षण विभागाच्या २०१९-२० च्या मूल्यांकनाच्या अहवालावरून राज्यातील १८ तालुके भूजलाच्या अतिउपस्यामुळे डार्क झोनमध्ये आल्याने चिंता वाढली आहे. जमिनीचा जलस्तर आटण्याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे बोअरवेलचा अतिरेक. पण नागपूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दोन वर्षापूर्वी हा धोका ओळखला, जमिनीची चाळण टाळण्यासाठी मिशन फ्लिशिंग हे अभियान राबविले. त्यामुळे यावर्षी जिल्हा परिषदेने एकही नवीन बोअरवेल केली नाही.
त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेने शासनाच्या ३ कोटी ८० लाख रुपये इतक्या रकमेची बचत झाली आहे. फ्लशिंगमुळे जुन्या व कित्येक वर्ष अडगळीत पडलेल्या बोअरवेल पाण्याने भरभरून वाहत आहे़ स्थानिक गावकऱ्यांचा पाणीप्रश्न सुटण्यात मोलाची मदत झाली आहे. यावर्षी विभागाला ३७८ चे फ्लशिंग पूर्ण करण्याचे टार्गेट होते़ त्यापैकी ३७७ बोअरवेलला पुनर्जीवित करण्यात आल्या आहेत.
- जिल्ह्यात ९ हजारावर बोअरवेल
नागपूर जिल्ह्यात एकूण बोअरवेलची संख्या ९ हजाराच्या जवळपास आहे. मतांच्या राजकारणासाठी लोकप्रतिनिधी बोअरवेलचा विषय ‘हायजॅक’ करतात. टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलची मागणी करतात. त्यामुळे प्रशासनही टंचाई आराखडा तयार करताना जास्तीच्या बोअरवेल मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवितात. यंदाच्याही टंचाई आराखड्यात २५७ नवीन बोअरवेल मंजुरीसाठी पाठविल्या होत्या. पण ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने मिशन फ्लशिंग कार्यक्रम उन्हाळ्यापूर्वी राबविल्याने नवीन बोअरवेलची गरज भासली नाही.
- निर्लेखित झालेले होते बोअर
जे बोअरवेल बंद पडले होते. निर्लेखन करण्याचे प्रस्ताव ज्या बोअरवेलचे होते. त्या बोअरवेल बंद पडण्यामागे कारण शोधले. त्यात गाळ फसल्याने बंद पडल्याचे आढळले. काही गावांनी उपयोग होत नसल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले होते. फ्लशिंगच्या माध्यमातून त्या बोअरवेलला पुनरुजीवित केले. नवीन बोअरवेलला लागणारा खर्च आणि फ्लशिंगच्या होणाऱ्या खर्चात बरीच तफावत असल्याने बराच खर्च वाचला.
- बोअरवेलचे निकष २०० फुटाचे
शासनाने बोअरवेलचे निकष २०० फुट ठेवले आहे. पण या निकषाकडे ग्रामस्थांनी दुर्लक्ष केले आणि बोअरवेलची खोली आणखी वाढविली. तसे टंचाईच्या निकषानुसार २० लिटर पाणी एका व्यक्तीला मिळाले पाहिजे. बोअरवेल ताशी ५० लिटर पाणी देते. पण काहींनी बोअरवेल आणखी खोल करून त्यात मोटार पंप लावल्याने जमिनीचा उपसा अधिकचा वाढला.
- शासनाच्या नियमानुसार कुणालाही ६० मीटर किंवा २०० फूटापर्यंतच बोअरवेल खोदण्याची परवानगी देण्यात येते. शासन व नाबार्डच्या धोरणानुसार बोअर किंवा ट्यूबवेलला शाश्वत स्त्रोत मानले जात नाही. मात्र शेतकरी किंवा इतर लोक ५०० ते १००० फूटापर्यंत खोदकाम करतात. खोल खोदलेल्या बोअरवेलमुळे वरच्या स्तरावरचेही पाणी आटते. यामुळेच हिवरेबाजार येथे बोअरवेलद्वारे भूजल उपशावर बंदी घालण्यात आली तेव्हा तेथील जलस्तर वाढला. बोअरवेलद्वारे होणारा अनिर्बंध उपसा भूजलस्तर कमी करण्याचे मोठे कारण आहे.
- सुनील कडू, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग
- गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात ३ हजाराच्या जवळपास नवीन बोअर झाले. दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात ८१८ नवीन बोअर खोदले. गेल्यावर्षी ही संख्या २०० वर आणली आणि यावर्षी नवीन बोअरच खोदायचे नाही, असे ठरविले. प्रशासनाने त्यासाठी सहकार्य केले. फ्लशिंगचा कार्यक्रम वेगाने राबविला. पाणी वेळेत जुन्याच बोअरवेलमधून मिळायला लागल्याने टंचाई जाणवलीच नाही़
- नीलेश मानकर, उपअभियंता, यांत्रिकी विभाग, जि.प़ नागपूर