महामार्गावर चहाटपरी चालविणाऱ्याच्या सिफा खानने मिळवले ८० टक्के गुण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 07:45 AM2022-06-10T07:45:00+5:302022-06-10T07:45:02+5:30
Nagpur News रात्रभर महामार्गावर चहाटपरी चालविणाऱ्याच्या मुलीने बारावीत विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळवीत दमदार यश संपादन केले आहे. सिफाखान समिमखान असे तिचे नाव आहे.
कैलास निघोट
नागपूर: रात्रभर महामार्गावर चहाटपरी चालविणाऱ्याच्या मुलीने बारावीत विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळवीत दमदार यश संपादन केले आहे. सिफाखान समिमखान असे तिचे नाव आहे. मात्र ‘नीट’साठी अर्ज करण्याची संधी हुकल्याने तिला एमबीबीएसच्या प्रवेशासाठी मुकावे लागणार आहे.
सिफाखान समिमखान ही जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवलापार येथे राहते. ती रामटेक येथील समर्थ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
समिमखान हे मूळचे गर्रा येथील राहणारे आहे. त्यांची मानेगाव टेक येथे चहाटपरी होती. मात्र, महामार्गावर दुकाने आल्याने ते हटविण्यात आले. यानंतर ते देवलापार येथे भाड्याच्या घरात राहायला आले. मिळेल ते काम करून कुटुंबीयाचा उदरनिर्वाह करू लागले. अशातच सिफाची आई शाहिदा यांना बॅंकेत देवाण-घेवाणच्या व्यवहाराचे काम मिळाले. त्यातून कसाबसा संसार चालू होता. अशातच समिमने पुन्हा मानेगावटेक येथे चहाटपरी सुरू केली. सिफाचा लहान भाऊ रेहानही मिळेल ते काम करतो. महामार्ग असल्याने व रात्रभर वाहतूक असल्याने त्यांनी टपरी सुरू तर केली. परंतु पाहिजे तसे उत्पन्न नाही. तरीही संघर्षातून खान कुटुंब जीवन जगत आहे. मुलीच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करून तिला उच्च शिक्षण देण्याची तयारी असल्याचे समिम व शाहिदा यांनी सांगितले.
सिफा अभ्यासात हुशार आहे. तिला वैद्यकीय शाखेत करिअर करायचे आहे. १० वीनंतर तिने रामटेक येथील महाविद्यालयात प्रवेश दिला. साधने वेळेवर उपलब्ध नसताना दररोज मिळेल त्या साधनाने ३५ किलोमीटर ये-जा करीत तिने संघर्षातून ८० टक्के गुण मिळविले. संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद वेगळाच असतो असे सिफाखानने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नीटची संधी हुकली
एमबीबीएसला प्रवेश घेण्यासाठी नीट ही पूर्वपरीक्षा द्यावी लागते. मात्र, या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सिफाची संधी हुकली.