सिग्नल बंद, वाहनचालकांची मनमानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:09 AM2021-01-03T04:09:21+5:302021-01-03T04:09:21+5:30
नागपूर : शहरात अनलॉकनंतर रस्त्यावर वाहने मोठ्या संख्येने धावत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चौकाचौकात सिग्नल लावण्यात आले ...
नागपूर : शहरात अनलॉकनंतर रस्त्यावर वाहने मोठ्या संख्येने धावत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी चौकाचौकात सिग्नल लावण्यात आले आहेत, पण अनेक चौकातील सिग्नल नेहमीच बंद असतात. त्यामुळे वाहनचालक मनमानी करतात.
लोकमतच्या प्रतिनिधीने बंद सिग्नलवर थांबून वाहतूक व्यवस्थेची पाहणी केली. सिग्नल बंद असलेल्या चौकात वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून वेगाने वाहन नेताना दिसले. शहरातील काही रस्त्यांवर व चौकात वाहतूक विभागातर्फे वाहतूक नियमांचे उल्लंघन न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते, पण काही चौकात सिग्नल बंद असल्याने मनमानी सुरू असून वाहतूक विभागातर्फे त्यांच्याकडे कानाडोळा करण्यात येतो. वाहनचालकांची मनमानी आता अनेक ठिकाणी अपघाताचे कारण बनत आहे.
हेल्मेटकडे कानाडोळा
सिग्नल बंद असलेल्या सर्वच चौकात वाहनचालक हेल्मेटविना वाहन चालविताना दिसून आले. या चौकात वाहतूक पोलीस दिसले नाहीत. या कारणाने वाहन वेगाने चालवून वाहनचालक जास्त मनमानी करताना आढळून आले.
यू-टर्नमुळे संकट
सदर उड्डाणपुलाजवळ सूचनाफलक लावल्यानंतरही दुचाकी आणि चारचाकी वाहनचालक यू-टर्न घेताना दिसून आले. असाच प्रकार सिग्नल बंद असलेल्या चौकातही दिसला. या ठिकाणी वाहनचालक इंडिकेटरविनाच सर्रास यू-टर्न घेताना दिसून आले. यामुळे मागून येणारे वाहन त्या वाहनाला धडक देण्याच्या स्थितीत असते. या स्थितीमुळे अनेक अपघात घडले आहेत.
एकमेकांवर ढकलत आहेत जबाबदारी
शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग असवाद म्हणाले, शहरात १७३ सिग्नल असून त्यापैकी २७ बंद आहेत. चौकातील सिग्नलची देखभाल करण्याची जबाबदारी मनपाची आहे. बंद सिग्नलची माहिती मनपाला अनेकदा दिल्यानंतरही दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. तर मनपाचे अभियंता मानेकर म्हणाले, शहरात सर्वच चौकातील सिग्नल सुरू आहेत. त्याला दररोज सुरू आणि बंद करण्याची जबाबदारी वाहतूक विभागाची आहे. हे दोन्ही विभाग आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत.
हे बंद आहेत सिग्नल
लोकमत चमूने मंगळवारी चौक, सदर चौक, छावनी चौक, अवस्थीनगर चौक, पोलीस लाईन टाकळी तलाव चौक परिसरातील सिग्नलची पाहणी केली असता ते बंद असल्याचे दिसून आले. वाहतूक पोलीस उपायुक्तांनीही शहरातील २७ चौकातील सिग्नल बंद असल्याचे म्हटले आहे. त्यानंतरही मनपाचे अधिकारी शहरातील सर्व सिग्नल सुरू असल्याचा दावा करीत आहेत.