पीक कर्जाच्या पुनर्गठनाचे संकेत
By admin | Published: June 20, 2015 02:57 AM2015-06-20T02:57:21+5:302015-06-20T02:57:21+5:30
जिल्ह्यातील ३७ हजार ९३० जुन्या कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेल्या ...
मुख्यमंत्री घेणार निर्णय : पालकमंत्र्यांनी घेतला आढावा
नागपूर : जिल्ह्यातील ३७ हजार ९३० जुन्या कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्थेमार्फत घेतलेल्या ३७८.३५ कोटी रुपयांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शासनस्तरावर निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
रविभवन येथे शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या वाटपाबाबत अग्रणी बँक व वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांसोबत पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. बावनकुळे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील जे जुने कर्ज थकबाकीदार शेतकरी आहेत. ज्यांनी वर्ष २००९ व २०१० मध्ये कर्ज घेतले होते, त्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे थकबाकीदार झालेल्या या शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्ज देण्यासाठी आपण पुढाकार घेऊन शासनासोबत चर्चा केली. यावर मुख्यमंत्री लवकरच शासनस्तरावर धोरणात्मक निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस खासदार कृपाल तुमाने, आ. सुधीर पारवे, आ. डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मुख्य कार्यपालन अधिकारी शिवाजीराव जोंधळे, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू जिल्हा अग्रणी बँकेचे मोहन मशानकर, सी.वाय. देशमुख, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक सुधीर धनविजय, मनोहर देवरे, एस.डी. कोगदे, रामानुज प्रसाद, द.वा. निकोसे, प्रदीप अंबरखाने, पारुल नंदनवार, धीरज खोब्रागडे, एस.डब्ल्यू. सुसनकर, रमेश रामटेके, डी.व्ही बानबोळे उपस्थित होते.