विदर्भातील वन पर्यटन बहरण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:08 AM2020-12-31T04:08:47+5:302020-12-31T04:08:47+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्रवेशद्वारांचे आधुनिकीकरण होणार आहे. मोहर्लीत इंटरप्रिटिशन केंद्र सुरू होणार असून बेलोरा हे नवे गेट नववर्षदिनी ...
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व प्रवेशद्वारांचे आधुनिकीकरण होणार आहे. मोहर्लीत इंटरप्रिटिशन केंद्र सुरू होणार असून बेलोरा हे नवे गेट नववर्षदिनी सुरू होत आहे. पर्यटनाला वाव देण्यासाठी मदनापूर (गोंडमैल) तलावात बोटिंग सुरू होत आहे. कन्हाळगाव अभयारण्याच्या घोषणेमुळे नववर्षात विकासाची पाऊलवाट गोंडपिपरीमध्ये निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
टिपेश्वर या नव्या व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्राचा नव्या वर्षात क्षेत्रविस्तार होण्याची गरज आहे. खितपत पडलेल्या वनउद्यान, ॲाक्सिजन पार्कला नवसंजीवनी मिळावी, तसेच दारव्हा रोडवरील चंदनपार्क आणि बॉटनिकल गार्डनच्या विकासाचे स्वप्न पूर्ण व्हावे.
गडचिरोलीच्या जंगलात आता वाघांचा वावर सुरू झाला आहे. नववर्षात यासाठी नियोजनाची गरज आहे. रॅपिड रेस्क्यू युनिटच्या उभारणीसोबतच आलापल्लीमधील रानम्हशींसाठीच्या संरक्षित क्षेत्र आणि चपराळा अभयारण्याच्या विकासाची आठवण नववर्षात तरी वनविभागाला यावी.
वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना लक्षात घेता बफर झोनच्या विस्ताराची गरज आहे. रेस्क्यू टीमला सक्षम केले जावे. सारंगपुरी (आर्वी) तलावाचा विकास आणि सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत पवनारमधील प्रस्तावित सौंदर्यीकरण हे पर्यटकांचे नववर्षातील आशास्थान आहे. नावारूपास येत असलेल्या मेळघाटमधील पर्यटन आणि वनविकासाला असलेली निधीची गरज या वर्षात पूर्ण होईल, अशी आशा आहे.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात भरपूर संधी आहेत. कोका, नागझिरा अभयारण्य, पवनी गेट येथील पर्यटनाला असलेला वाव तसेच नवेगाव-नागझिराचे पक्षिवैभव आणि वनातील जैवविविधता वनविभागाने या वर्षात तरी लक्षात घ्यायला हवी.
...
नव्या आशांचे बीजारोपण
कोरोनाचे संकट घेऊन आलेल्या २०२० या वर्षाने मनात भीतीचे काहूर माजविले असले तरी नव्या आशांचे बीजारोपणही केले आहे. नागपूर जिल्ह्यात गोरेवाडातील इंडियन सफारी, मोगरकसा इको टुरिझम, मुनिया वनक्षेत्र संरक्षित क्षेत्र होण्याच्या दृष्टीने सुरू झालेल्या हालचाली आशादायक आहेत. यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्याला मिळालेला स्वतंत्र व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा आणि चंद्रपुरातील कन्हाळगाव या नव्या अभयारण्याची घोषणा ही नव्या वर्षातील नवी आशास्थाने ठरली आहेत.