तर परत मराठा समाजातर्फे मूक आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:35+5:302021-07-07T04:09:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर सकारात्मकता दाखविल्यामुळे आम्ही संयम राखला होता. परंतु सरकारने दिलेली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर सकारात्मकता दाखविल्यामुळे आम्ही संयम राखला होता. परंतु सरकारने दिलेली महिन्याभराची मुदत संपत असून शब्द पाळण्यात आला नाही तर परत समाजातर्फे मूक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खा. संभाजीराजे छत्रपती यांनी सोमवारी दिला. राज्यव्यापी जनसंपर्क यात्रेदरम्यान नागपुरात आले असता नागपूर पत्रकार क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून आमचे मुद्दे नेत्यांनी तेथे मांडावे. ज्या गोष्टी राज्य शासनाच्या हाती आहे त्यावर त्यांनी त्वरित पावले उचलली पाहिजेत. शासनाने मराठा आरक्षण मुद्द्यावर पुनर्विचार याचिका दाखल करावी. जर ते जमले नाही तर मागासवर्ग आयोग स्थापन करून मराठा समाज कसा मागास आहे याचे सर्वेक्षण करावे. राज्यपालांकडे सखोल अहवाल सादर करावा. केंद्र शासनालादेखील आरक्षणासाठी वटहुकूम काढावा लागेल. केवळ घटनादुरुस्ती झाली तरी आरक्षण मिळाले असे होत नाही. मराठा आरक्षणाची प्रक्रिया सुरू करावी. लोकसभेतील सर्व खासदारांनी या मुद्यावर एकत्रित येत पंतप्रधानांची भेट घेतली पाहिजे, असे प्रतिपादन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.
आंदोलनातून जनतेला वेठीस धरू नये
कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. आक्रोश मोर्चा काढणे हा समाजातील प्रतिनिधींचा अधिकार आहे. लाखोंच्या संख्येने रस्त्यावरदेखील उतरता येईल. मात्र सध्या परिस्थिती तशी नाही. शिवाय आंदोलनातून जनतेला वेठीस धरणे योग्य नाही. नेत्यांनी समाजाला दिशा द्यावी, दिशाहीन करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एमपीएससीच्या परीक्षा घेताच का?
स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्यानंतर एमपीएससीच्या कारभारातील संथपणा समोर आला आहे. कष्टाने परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील नियुक्ती मिळत नसेल तर मग एमपीएससीच्या परीक्षाच का घेता, असा सवाल खा. संभाजीराजे छत्रपती यांनी केला. अगोदरचे सरकार तसेच आताचे सरकार या मुद्द्यावर अपयशी ठरले आहे. यातून लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे, असे ते म्हणाले.
नक्षल्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे
नक्षलवाद्यांनी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक असल्याचा दावा केला आहे. कायदा हातात घेऊन काम करा असे शिवरायांनी कधीच सांगितले नव्हते. नक्षलवाद्यांनी कायद्याचे पालन करावे, मगच शिवरायांचे नाव घ्यावे. त्यांनी मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले.