नागपुरात सलून व ब्युटीपार्लर उघडण्यासाठी मूक प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 09:17 PM2020-06-06T21:17:51+5:302020-06-06T21:19:41+5:30
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांची दुकाने गेल्या १९ मार्चपासून बंद आहेत. यामुळे सलून कारागीर व सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात सलून व्यावसायिकांची दुकाने गेल्या १९ मार्चपासून बंद आहेत. यामुळे सलून कारागीर व सलून व्यावसायिकांवर उपासमारीची पाळी आली आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने शनिवारी राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले.
महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष रवी बेलपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, खासदार, आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्यातील सर्वच मंत्री, जिल्हाधिकारी तसेच अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निवेदने देण्यात आली.
लॉकडाऊनच्या काळात आजतागायत दुकाने बंद असल्याने नाभिक समाजाचे हाल सुरू आहेत. सलून कारागीर संकटात आहेत. त्यामुळे समाजबांधवांनी आपापल्या दुकानासमोर तीन तास मूक प्रदर्शन केले. काळी फीत लावून ‘माझे दुकान-माझी मागणी’ असे फलक दुकानदारांनी झळकविले. कन्टेन्मेंट झोन वगळून नागपूर शहरासह महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सर्व सलून व ब्युटीपार्लर दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, सलून, पार्लर दुकान भाडे व घरभाडे माफ करावे, तीन महिन्याचे विद्युत बिल माफ करावे, व्यावसायिक आणि कारागिरांना आर्थिक थेट स्वरूपाची मदत राज्य सरकारने जाहीर करावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. महामंडळाचे नागपूर जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर, जिल्हा युवा अध्यक्ष अमोल तलखंडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय वाटकर, जिल्हा सरचिटणीस सतीश फोफसे, जिल्हा युवा सरचिटणीस प्रवीण चौधरी आदींच्या नेतृत्वात सक्करदरा चौकातील दुकानासमोर शेकडो सलून कारागीर व दुकानदारांनी सहभाग घेतला.
या आंदोलनासाठी महाराष्ट्र नाभिक टायगर सेना, महाराष्ट्र सलून असोसिएशन, नाभिक एकता मंच, श्री केसकर्तन सेवा सहकारी संस्था, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या कल्पना अतकरे यांच्यासह अनेक संघटनांनी पाठिंबा जाहीर केल्याचे तलवारकर यांनी म्हटले आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी श्याम चौधरी, रमेश उंबरकर, प्रमोद मिरासे, प्रवीण आंबोलकर, गणेश वाटकर, अमित लक्षणे, कैलास जांभुलकर, प्रकाश द्रवेकर, नामदेव पारधी, अमोल ठामके, चंद्रकांत येसकर, कपिल लक्षणे, गणेश लाखे, शारदा जांभुलकर, शुभांगी भोयर, रंजना चौधरी, अर्चना जांभुलकर आदींनी सहभाग घेतला.