सायलेंट मार्च फॉर विदर्भ : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हुंकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 10:50 PM2018-12-22T22:50:51+5:302018-12-22T22:53:44+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. संविधान चौक ते यशवंत स्टेडियमपर्यंत काढण्यात आलेल्या या सायलेंट मार्चमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह नागपूरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात तरुणांंची संख्या लक्षवेधी होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी मागील काही वर्षांपासून राजकीय पक्ष व विविध संघटना आपापल्यापरीने आंदोलन करीत आहेत. आता या आंदोलनात तरुणांचाही सहभाग वाढला आहे. युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. संविधान चौक ते यशवंत स्टेडियमपर्यंत काढण्यात आलेल्या या सायलेंट मार्चमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह नागपूरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यात तरुणांंची संख्या लक्षवेधी होती.
या सायलेंट मार्चचे ना कुणी नेतृत्व होते. ना कुणी प्रायोजक. सर्वसामान्य नागपूरकर हा याचा केंद्रबिंदू होता. हे या मार्चचे वैशिष्ट्य होते. संविधान चौक येथून दुपारी ३ वाजता हा मार्च निघाला. तत्पूर्वी संविधान चौक येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे एक सेल्फी पॉईंट होता. यात सायलेंस मार्च फॉर विदर्भ लिहिलेले असून त्यासमोर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती. तसेच स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. यासोबतच विदर्भ राज्याबाबत आपल्याला काय वाटते, ते एका पेपरवर लिहून द्यावयाची आगळीवेगळी मोहीमह राबवण्यात आली. यातही नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर हा मार्च निघाला. यशवंत स्टेडियम येथे पोहोचल्यावर डॉ. शशांक भोयर आणि मृणाली चिकटे या विद्यार्थ्यांनी आणि वर्धा येथील नंदाताई अलोणे या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलेने स्वतंत्र विदर्भाबाबत आपले मनोगत व्यक्त करीत स्वतंत्र विदर्भ झाल्यावरच येथील प्रश्न सुटतील, असा विश्वास व्यक्त केला.
या सायलेंट मार्चमध्ये माजी कुलगुरु प्रा. हरिभाऊ केदार, डॉ. कमल सिंग, प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, प्रबीरकुमार चक्रवर्ती, राजकुमार तिरपुडे, अॅड. मुकेश समर्थ, डॉ. गोविंद वर्मा, तेजिंदरसिंग रेणू, जयदीप कवाडे, नवनीतसिंग तुली, धनंजय धार्मिक, अॅड. रवी संन्याल, अॅड. नीरज खांदेवाले, संदेश सिंगलकर, अॅड. स्मिता सिंगलकर, अविनाश काकडे, त्रिशरण सहारे, ज्ञानेश्वर रक्षक, नितीन रोंगे, माजी आमदार रमेश गजबे, राम आखरे, दीपक निलावार, दिलीप नरवडीया, विलास गजघाटे, उत्तम सुळके, मधुकर कुडू, उत्तमबाबा सेनापती, प्रभाकर फुलबांधे, माधवराव चन्ने, विलास भालेकर, राजेश बोरकर, विलास भालेकर, आदीसह विदर्भ राज्य आंदोलन समिती, किसान संघ, विदर्भ टॅक्सपेयर असोसिएशन, जनमंच, व्ही-कॅन, विदर्भ राज्य आघाडी (विरा), विदर्भ माझा, मराठा सेवा संघ, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, किसान सेवा संघ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ, तृतीय पंथी समाज संघटन, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, विदर्भ ऑटो संघ यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी झाले होते.
तृतीयपंथी व तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर
या सायलेंटर मार्चची खास बाब म्हणजे या मार्चमध्ये विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होतेच. परंतु तृतीयपंथी सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तसेच विद्यार्थी आणि तरुणांची संख्याही लक्षणीय होती.