रेशीम उद्योग शेतीला उत्तम जोडधंदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:11 AM2021-02-23T04:11:41+5:302021-02-23T04:11:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती साेडून आगळीवेगळी शेती करणे गरजेचे आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती साेडून आगळीवेगळी शेती करणे गरजेचे आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलू शकते. रेशीम उद्योगातून आर्थिक उन्नती साधता येत असल्याने हा उद्याेग शेतीला उत्तम जोडधंदा आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे यांनी सावनेर पंचायत समिती सभागृहात आयाेजित रेशीम कार्यशाळेत केले.
महा रेशीम अभियान २०२१ अंतर्गत जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने या कार्यशाळेचे आयाेजन करण्यात आले हाेते. याप्रसंगी पंचायत समिती प्रकाश पराते, पंचायत समिती सदस्य जिजा बागडे, सहायक संचालक महेंद्र ढवळे, खंडविकास दीपक गरुड, कृषी अधिकारी चंद्रकांत वानखेडे, रेशीम विकास अधिकारी अजय वासनिक, तांत्रिक अधिकारी रजनी बन्सोड, प्रगतिशील रेशीम उत्पादक चंद्रभान धोटे उपस्थित हाेते.
बदलत्या वातावरणामुळे रेशमाचे चांगले उत्पादन हाेऊ शकते, असेही अरुणा शिंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून रेशीम उद्योग केल्यास शासनाकडून मदत मिळेल, अशी माहिती सहायक संचालक महेंद्र ढवळे यांनी दिली. रामटेक तालुक्यातील रेशीम उद्योजक चंद्रभान धोटे हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांची शेती बघण्यासाठी दुसऱ्या जिल्ह्यातून शेतकरी येतात. त्यांनी रेशीम शेतीतून आर्थिक प्रगती केल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व संचालन रेशीम विकास अधिकारी अजय वासनिक यांनी केले तर विस्तार अधिकारी (कृषी) दिनेश खोपे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेला सेवानिवृत्त कृषी अधिकारी संजय गायकवाड, कृषी अधिकारी प्रीती गाडे, सतीश लेकुरवाळे यांच्यासह कृषी विभागातील कर्मचारी व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
...
नाेंदणी करण्याचे आवाहन
प्रत्येक शेतकऱ्याने किमान एक एकरात रेशीम शेती करावी. ज्यांना रेशीम शेती व उद्याेग करावयाचा आहे, त्यांनी २६ फेब्रुवारीपूर्वी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे ५०० रुपये देऊन नाेंदणी करावी. नाेंदणी करतेवेळी सातबारा, आठ अ, शेताचा नकाशा, आधार कार्ड, बँक पासबुकची झेराॅक्स व जाॅब कार्ड सादर करावे, असे आवाहन पंचायत समिती उपसभापती प्रकाश पराते यांनी केले.