आगीच्या ढिगाऱ्यावर नागपुरातील मस्कासाथ, रेशीम ओळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 08:04 PM2020-06-17T20:04:53+5:302020-06-17T20:07:33+5:30
जंगल्याजी धोंडबाजी या फर्मच्या मस्कासाथ, रेशीम ओळ येथील प्लास्टिक व केमिकलचा साठा असलेल्या गोडाऊनला सोमवारी आग लागून कोट्यवधींचा माल जळाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले. नागपुरात अनेक दाट वस्त्यांमध्ये यासारखी अनधिकृत गोडाऊन बरीच असल्याने संपूर्ण वस्त्याच आगीच्या ढिगाऱ्यावर उभ्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगल्याजी धोंडबाजी या फर्मच्या मस्कासाथ, रेशीम ओळ येथील प्लास्टिक व केमिकलचा साठा असलेल्या गोडाऊनला सोमवारी आग लागून कोट्यवधींचा माल जळाला. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला अथक परिश्रम घ्यावे लागले. नागपुरात अनेक दाट वस्त्यांमध्ये यासारखी अनधिकृत गोडाऊन बरीच असल्याने संपूर्ण वस्त्याच आगीच्या ढिगाऱ्यावर उभ्या आहेत. अशा अनधिकृत गोडाऊनवर संबंधित विभागाने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिक आणि व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
मस्कासाथ आणि रेशीम ओळ भागातील दाट लोकवस्तीमध्ये ज्वलनशील पदार्थांची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानांमध्ये केमिकलचा साठा आहे. एखाद्या दुकानाला आग लागली तर ती अन्य दुकानांमध्ये पसरण्यास वेळ लागत नाही. अनेकांची दुकाने लहान असली तरीही त्यांनी लोकवस्तीत गोडाऊन भाड्याने घेऊन ज्वलनशील पदार्थांचा साठा केला आहे. असेच गोडाऊन जागनाथ बुधवारी, चुना ओळ, टिमकी आणि लालगंजला जाणाºया मार्गावरील वस्त्यांमध्ये जवळपास ३०० च्या आसपास आहेत. सर्व गोडाऊनमध्ये भरपूर साठा आहे. अग्निशमन उपकरणांच्या नावावर त्यांच्याकडे शून्य उपाययोजना आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गोडाऊनची संख्या वाढतच आहे. या गोडाऊनची मनपाकडे कुठलीही नोंद नाही. मनपाच्या अधिकाऱ्यांनीही गोडाऊनची पाहणी करण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे कारवाईचा प्रश्नच नाही. याच कारणाने प्लास्टिक आणि केमिकलचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांचा कुठलाही धाक उरला नाही. या सर्व अनधिकृत गोडाऊनची तपासणी करून कारवाई करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी लोकमतकडे केली.
जागनाथ बुधवारी येथील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मध्य नागपूरचे अध्यक्ष मिलिंद मानापुरे म्हणाले, या भागातील वस्त्यांमधील लहान गल्ल्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून व्यावसायिक संकुल आणि इमारती तयार करण्यात आलेल्या आहेत. तिथे आगीचे बंब जाऊ शकत नाहीत. बऱ्याच इमारतींमध्ये फायर अलार्म व आग विझविण्याची उपकरणे लावलेली नाही. या परिसरातील इमारतींचे ऑडिट करून नियमानुसार कार्यवाही करावी, जेणेकरून यानंतर मालहानी किंवा जीवितहानी होणार नाही.
इमारतीतील गोडाऊनचे लवकरच सर्वेक्षण करणार
मस्कासाथ, रेशीम ओळ, बंगाली पंजा, इतवारी, टिमकी, गांधीबाग या भागात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात आहे. दाट वस्त्यांमध्ये अनेकांनी लहान जागेवर मोठे गोडाऊन बांधले आहेत. अनेकांच्या घरी कुटीर उद्योग आहेत. लहान बोळीत अनधिकृत बांधकामामुळे आग लागल्यानंतर आगीचे बंब जात नाही. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होते. असाच प्रकार सोमवारी घडला. कोविड-१९ पूर्वी या भागाचे सर्वेक्षणाचे काम सुरू होते. लवकरच सर्वेक्षण सुरू करून अग्निशमन उपकरणांची तपासणी करणार आहे.
राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा.