गाळ, माती, मुरूम, दगड मिळणार विनामूल्य ! पाणंद रस्ते योजनेचे शेतकऱ्यांना होणारे फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 11:10 IST2025-04-05T11:09:19+5:302025-04-05T11:10:02+5:30
Nagpur : मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून शेतकऱ्यांची समृद्धी

Silt, soil, gravel, stones will be available for free! Benefits of Panand Road Scheme for farmers
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्याला शेतापर्यंत पोहोचण्यासह कृषी यंत्रसामग्री सहज वाहून नेता आली पाहिजे. यासाठी पाणंद रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र, अनेक ठिकाणी पाणंद रस्त्यांची अवस्था खराब असून, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यास अडचणी येतात. याच पार्श्वभूमीवर सरकारने 'मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना' प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यात राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामांसाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील. महामार्ग विकसित करण्यासारखेच शेतरस्त्यांच्या विकासालाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या अवजड यंत्रसामग्रीचा वापरही सहज शक्य होतो.
पाणंद रस्ते योजनेचे फायदे
- शेतीच्या शिवारात जाण्यासाठी पक्के रस्ते उपलब्ध होतात.
- शेतमाल वाहतुकीसाठी रस्ते सोपे होतात, ज्यामुळे मालाची गुणवत्ताही टिकून राहते.
- शेतीमाल गतीने बाजारपेठेत पोहोचवता येतो, त्यामुळे योग्य दर मिळतो.
- वाहतुकीचा खर्च कमी झाल्यामुळे नफा वाढतो.
- चिखल, दलदलीमुळे होणाऱ्या अडचणी टाळता येतात.
- रस्त्यांवर पाणी साचत नाही, त्यामुळे वाहतूक सतत सुरू राहते.