जीएसटीसह चांदीची लाखाकडे वाटचाल, गुरुवारी १,६०० रुपये, तर जुलैमध्ये ५,५०० रुपयांची वाढ!
By मोरेश्वर मानापुरे | Published: July 11, 2024 11:27 PM2024-07-11T23:27:43+5:302024-07-11T23:28:29+5:30
गुरुवारी सोनेही २०० रुपयांनी वाढून ७३,१०० रुपयांवर पोहोचले.
मोरेश्वर मानापुरे, नागपूर: आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम गुरुवारी नागपूर सराफा बाजारात दिसून आला. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीला मागणी वाढल्याने नागपुरात एकाच दिवसात प्रतिकिलो १,६०० रुपयांची वाढ होऊन भाव ९४,२०० रुपयांवर पोहोचले. तीन टक्के जीएसटीसह चांदीची लाखाकडे वाटचाल सुरू आहे. गुरुवारी सोने २०० रुपयांनी वाढून ७३,१०० रुपयांवर पोहोचले.
जुलै महिन्यात अकरा दिवसात चांदीच्या दरात तब्बल ५,५०० रुपयांची वाढ झाली. १ जुलैला प्रतिकिलो चांदीचे दर ८८,७०० रुपये होते. २ जुलैला ८०० रुपये आणि ३ जुलैला १,३०० रुपयांची वाढ होऊन भाव ९०,८०० रुपयांवर पोहोचले. ४ रोजी भाव स्थिर होते. मात्र ५ जुलैला भाव १ हजाराने वाढून ९१,८०० रुपये आणि ६ रोजी ६०० रुपयांनी वाढून ९२,४०० रुपयांवर गेले. ८ जुलै चांदीत ३०० रुपयांची वाढ, तर ९ रोजी २०० रुपयांची घसरण झाली. १० रोजी चांदीचे भाव ४०० रुपयांनी वाढून ९२,६०० रुपयांवर गेले. गुरुवारी तब्बल १,६०० रुपयांची दरवाढ झाली आणि भावपातळी ९४,२०० रुपयांवर पोहोचली. सराफांकडे तीन टक्के जीएसटीसह चांदीचे भाव ९७,०२६ रुपयांवर पोहोचले असून लाखाकडे वाटचाल सुरू आहे.