राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांचे नागपुरात ‘सीमकार्ड रॅकेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 08:00 AM2022-12-06T08:00:00+5:302022-12-06T08:00:07+5:30
Nagpur News राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांकडून नागपुरात चालणाऱ्या ‘सीमकार्ड रॅकेट’चा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे.
योगेश पांडे
नागपूर : अनोळखी क्रमांकावरून फोन लावून काही क्षणांतच बॅंक बॅलन्स रिकाम्या करणाऱ्या ‘जामतारा पॅटर्न’ने देशभरातील पोलिसांना घाम फोडला होता. आता हीच ‘मोडस ऑपरेंडी’ वापरून देशाच्या विविध भागांत सायबर गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. राजस्थानमधील सायबर गुन्हेगारांकडून नागपुरात चालणाऱ्या ‘सीमकार्ड रॅकेट’चा नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने भंडाफोड केला आहे. नागरिकांच्या आधार कार्डावर सीमकार्ड खरेदी करण्यात येत होते व त्याबदल्यात नागरिकांना पैशाचे आमिष दाखविण्यात येत होते. पोलिसांनी गुन्हेगारांकडून अनेक सीमकार्ड जप्त केले आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाला या रॅकेटबाबत खबऱ्यांकडून ‘टीप’ मिळाली. तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल प्रिंस येथे थांबलेला एक तरुण नागरिकांकडून आधार कार्ड गोळा करत असल्याची ही माहिती होती. यानुसार पोलिसांनी सापळा रचला व प्रिंस हॉटेलजवळून एका तरुणाला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता, त्याने साबीर खान ऊर्फ मोहम्मद माजीद खान (२४, संभलगड, भरतपूर, राजस्थान) असे नाव सांगितले. त्याच्याकडे प्लास्टिकची पिशवी होती. त्यात मोबाइल व सुमारे वीस सीमकार्ड होते. त्याची चौकशी केली असता, त्याने अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने दिलेल्या माहितीवरून हे रॅकेट समोर आले. ते ऐकून पोलिसांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.
आरोपीच्या बॅंक खात्याला लिंक करायचे सीमकार्ड नंबर
साबीर हा त्याचा सहकारी सद्दाम खान (संभलगड, भरतपूर, राजस्थान) याच्यासोबत रॅकेट चालवत होता. त्याने व सद्दामने अनेक लोकांचे आधारकार्ड गोळा केले होते. त्यांचा उपयोग करून त्यांनी सीमकार्ड खरेदी केले होते. यातील काही सीमकार्ड क्रमांक त्यांनी सद्दामने राजस्थान येथे काढलेल्या बॅंक खात्याला ‘लिंक’ केले होते. या क्रमांकाच्या माध्यमातून ते नागरिकांना फोन करायचे व त्यांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढायचे. नागपुरातील सीमकार्ड्सचा वापर देखील त्यासाठीच होणार होता. पोलिसांनी दोघाही आरोपींविरोधात फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांना दोन हजार रुपयांचे आमिष
साबीर खान ऊर्फ मोहम्मद माजीद खान हा शहरातील विविध भागांत फिरून झोपडपट्टीमधील लोकांशी ओळख करून घ्यायचा. नागरिकांना तो आधार कार्ड घेऊन बोलवायचा. आधार कार्डचा उपयोग करून बँक खाते सुरू करण्यात येईल व त्याबदल्यात दोन हजार रुपये मिळतील, असे आमिष तो दाखवायचा. त्याच्या या आमिषाला अनेकजण बळी पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
काय आहे ‘जामतारा पॅटर्न’?
बोगस नावाच्या आधारे मोबाइल सीमकार्ड खरेदी केली जातात. त्या आधारे आरोपी त्यांच्याकडे असलेल्या डेटानुसार कुणालाही फोन करतात. फोनवर व्यक्तीला आपण बँकेतून किंवा सरकारी संस्थेतून बोलत असल्याचं सांगण्यात येतं. त्यावेळी एटीएम अथवा अकाउंट ब्लॉक करण्यात आले असल्याचे किंवा तत्सम कारण दिले जाते व बॅंक खाते, एटीएमची माहिती मागितली जाते. शिवाय ओटीपी मागून काही मिनिटांत खात्यातील पैसे दुसरीकडे वळते केले जातात. झारखंडमधील जामतारा गावातून यासंदर्भात मोठ्या प्रमाणात गुन्हे झाले आहेत.