आरोपी अरविंदच्या वडिलास सीम कार्ड दिले होते
By admin | Published: April 18, 2015 02:39 AM2015-04-18T02:39:21+5:302015-04-18T02:39:21+5:30
आरोपी अरविंद सिंग याचे वडील अभिलाषचंद्र सिंग याला आपण आपल्या निवडणूक ओळखपत्रावर व्होडाफोनच सीम कार्ड मिळवून दिले होते,
नागपूर : आरोपी अरविंद सिंग याचे वडील अभिलाषचंद्र सिंग याला आपण आपल्या निवडणूक ओळखपत्रावर व्होडाफोनच सीम कार्ड मिळवून दिले होते, अशी साक्ष मानकापूर हनुमान मंदिरातील पुजारी सुरेश रामगरीब पांडे यांनी युग चांडक हत्याकांड खटल्याच्या सुनावणी दरम्यान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयात दिली.
पांडे हे मूळचे उत्तर प्रदेशच्या बांधा जिल्ह्यातील गजपतीपूर येथील रहिवासी आहेत. आपली साक्ष देताना पांडे यांनी पुढे सांगितले की, पंडित शुक्ला यांनी मला मानकापूर येथील हनुमान मंदिरात पुजारी म्हणून नोकरी दिली. २००९ मध्ये नागपूर शहरात निवडणूक असल्याने एका शिष्याने मला ओळखपत्र तयार करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी त्याला निवडणूक ओळखपत्रासाठी दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आणि १५० रुपये दिले होते. त्याने दीड महिन्यानंतर मला ओळखपत्र आणून दिले.
अभिलाषचंद्र सिंग नेहमी पूजा करण्यासाठी हनुमान मंदिरात येत होता. त्याने मला मोबाईलसाठी सीम कार्ड खरेदी करायचे आहे, परंतु माझ्याकडे आवश्यक कागदपत्र नाहीत, असे म्हटले होते. माझ्याकडे निवडणूक ओळखपत्र असल्याने मी त्याच्यासोबत सीम कार्ड अवस्थीनगर येथील जे. एस. इलेक्ट्रॉनिक्स नावाच्या दुकानात गेलो होतो. अभिलाषचंद्र याने माझ्या नावाने व्होडाफोन कंपनीचे सीम कार्ड विकत घेतले होते, असेही त्याने सांगितले.
उलट तपासणीत पांडे यांनी घटना घडली त्या काळात हे सीम कार्ड माझ्या जवळ होते, हे खरे नाही, असे सांगितले.
नोडल अधिकाऱ्याची साक्ष
लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील मोबाईल आणि लँडलाईन संबंधातील सीडीआर आपणच उपलब्ध करून दिले होते, अशी साक्ष पुणे येथील रिलायन्स कम्युनिकेशन कंपनीतील नोडल आॅफिसर चंद्रकांत भोर यांनी दिली.
ते म्हणाले की, माझी कंपनी मोबाईल, लँडलाईन संबंधीचा सीडआर केवळ लॉ एन्फोर्सिंग एजन्सीला मागणीनुसार उपलब्ध करून देत असते. मलाच सीडीआरबाबतची सविस्तर माहिती पुरवण्याचा अधिकार आहे. १३ आॅक्टोबर २०१४ रोजी मला नागपूर शहर गुन्हेशाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांकडून १ सप्टेंबर २०१४ रोजीच्या ०७१२३२२०६०१ या क्रमांकाच्या लँडलाईन फोनचा सीडीआर मागण्यात आला.
लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना हा सीडीआर पाहिजे होता. त्यानुसार आपण संबंधित क्रमांकाच्या लँड लाईनचा सर्व्हरमधून सीडीआर काढला. हा लँडलाईन कामगारनगर येथील सुधीरकुमार शिवहरे यांच्या नावाने देण्यात आलेला होता. १ सप्टेंबर २०१४ रोजी हा लँडलाईन कार्यरत होता. सर्व्हरमधून आपण या लँडलाईनच्या सीडीआरची प्रिंट काढली आणि ती १५ आॅक्टोबर २०१४ रोजी नागपूर पोलिसांकडे एका पत्रासह पाठवून दिली. सीडीआरला भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ६५ (ब) अन्वये सर्टिफिकेटही संलग्न केले. सर्व्हरमध्ये समाविष्ट असलेल्या माहितीनुसार पाठविलेला सीडीआर हा खरा आणि बिनचूक आहे. लकडगंज ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या संबंधानेच १३ आॅक्टोबर रोजी ८९२८३७५८३२ क्रमांकाच्या मोबाईलचा सीडीआर मागण्यात आला होता. त्यानुसार आपण तो उपलब्ध करून दिला. उर्वेला कॉलनी येथील सुदर्शन तिवारी या नावावर हा मोबाईल होता.
२२ सप्टेंबर २०१४ रोजी इमेलद्वारे ९५९५६६३९६१ या क्रमांकाच्या मोबाईलचा १५ आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०१४ दरम्यानचा सीडीआर मागण्यात आला.
हा मोबाईल वंदेनगर येथील धन्नालाल दवारे या नावाने देण्यात आला होता. त्यानुसार सीडीआर देण्यात आला. या नावात धऊनडल दवसे , अशी ‘स्पेलिंग’ची चूक झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी, फिर्यादी मुकेश चांडक यांच्यावतीने अॅड. राजेंद्र डागा, अॅड. मनोज दुल्लरवार, आरोपींच्या वतीने अॅड. प्रदीप अग्रवाल, अॅड. मनमोहन उपाध्याय, अॅड. राजेश्री वासनिक आणि अॅड. प्रमोद उपाध्याय काम पाहत आहेत. (प्रतिनिधी)