मुख्यमंत्र्यांचा साधेपणा पोलिसांना भावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:10 AM2018-07-14T00:10:51+5:302018-07-14T00:15:51+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे ४,८०० पोलिसांची शुक्रवारी सायंकाळी येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात जाऊन भेट घेतली. त्यांची वास्तपुस्त करत मुक्त संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचा एकूणच साधेपणा आणि पालकाप्रमाणे त्यांनी आस्थेने केलेली चौकशी पोलिसांना कमालीची प्रभावित करून गेली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनासाठी राज्याच्या विविध भागातून आलेल्या सुमारे ४,८०० पोलिसांची शुक्रवारी सायंकाळी येथील प्रादेशिक पोलीस प्रशिक्षण केंद्रात जाऊन भेट घेतली. त्यांची वास्तपुस्त करत मुक्त संवाद साधला. मुख्यमंत्र्यांचा एकूणच साधेपणा आणि पालकाप्रमाणे त्यांनी आस्थेने केलेली चौकशी पोलिसांना कमालीची प्रभावित करून गेली.
राज्याच्या विविध भागातून राज्य पोलीस दल, महामार्ग सुरक्षा पथक, मुंबई रेल्वे या विविध दलाचे सुमारे ४,८०० पोलीस सध्या नागपुरात अधिवेशनाच्या बंदोबस्ताच्या निमित्ताने कर्तव्यावर आले आहेत. पोलीस आयुक्तालयामार्फंत शहरातील ५६ ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी ठिकाणापासून बंदोबस्ताच्या ठिकाणापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनांची सुविधा आहे. तसेच बंदोबस्ताच्या ठिकाणी दुपारी पोलिसांसाठी बफे पध्दतीनुसार जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी १० वैद्यकीय पथके तैनात असून पॉलिक्लिनिक मार्फंतही पोलिसांना आरोग्य सुविधा देण्यात येत आहे. महिला पोलिसांसाठी फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व सुविधांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी माहिती घेतली. त्यांनी अनेकांशी मुक्त संवाद साधला.
बंदोबस्तासाठी गावाकडून लांब आलो असलो तरी नागपूर पोलीस आयुक्तालयाने चांगल्या सुविधा दिल्याने येथील कर्तव्य कालावधी आनंददायक आणि समाधानकारक वाटतो, अशी प्रतिक्रिया नाशिक येथील सहायक पोलीस निरीक्षक वाल्मीक रोकडे यांनी यावेळी दिली.
पोलिसांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, मोठ्या कालावधीनंतर नागपुरात पावसाळी अधिवेशन होत आहे. त्यामुळे या अधिवेशनाचे एक वेगळे आव्हान आपल्या समोर होते. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला मोठ्या पावसाचा सामना करावा लागला. या कठीण प्रसंगी बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी फार चांगले कार्य केले. चोख बंदोबस्त ठेवण्यापासून लोकांना मदत करण्यापर्यंतचे त्यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
पोलिसांच्या हितासाठी राज्यशासन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. राज्याच्या विविध भागात पोलिसांसाठी ५० हजार नवीन निवासस्थाने बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिसांना स्वमालकीचे घर मिळावे यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. पोलिसांना वैयक्तिक घर खरेदीकरिता आतापावेतो २०८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून यापेक्षा अधिक रक्कम अजून दिली जाईल.
महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील अग्रगण्य पोलीस दल आहे. आपणा सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून याला जगातील उत्तम पोलीस दल बनविण्यासाठी कार्य करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच पोलिसांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, गृह विभागाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असल्यामुळे मागील तीन वर्षात पोलिसांच्या अनेक प्रलंबित मागण्यांना न्याय मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे पोलीस दल अधिक सक्षम बनत आहे. नागपुरातही पोलीस दलाच्या सक्षमीकरणातून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. पासपोर्ट पडताळणीचे सुलभीकरण, भरोसा सेल, अत्याधुनिक कंट्रोल रुम, पोलीस ड्युटी मीट सारखा उपक्रम, डिजिटल चार्जशीट, ट्रॅफिक क्लबसारखी संकल्पना राबविण्यात आली आहे. पोलीस दलाच्या प्रतिमेविषयी तसेच वागणुकीविषयी जनता समाधान व्यक्त करीत असल्याचे खासगी सर्वेक्षणातून पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी धुळे जिल्ह्यातील पोलीस शिपाई योगेश ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत केले.
जेवणासाठी रांगेत
मुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिसांसोबत चक्क रांगेत उभे राहून स्वत:च्या हाताने जेवण वाढून घेतले. एवढेच नव्हे तर पोलिसांसमवेत पंगतीत बसून मुख्यमंत्र्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळीदेखील त्यांनी पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यांच्या या वर्तनाने उपस्थित पोलीस अक्षरश: भारावून गेले होते.