पाकिस्तान विरोधात सिंधी समाजात रोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:38 PM2019-09-19T23:38:11+5:302019-09-19T23:40:09+5:30
पाकिस्तानातील घोटकी येथे हिंदू( सिंधी व पंजाबी) लोकांवर अत्याचार होत आहे. डॉ. निमृता चंदानी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने शहरातील सिंधी समाजात प्रचंड रोष आहे.
लोकमत न्यूज नेवटर्क
नागपूर : पाकिस्तानातील घोटकी येथे हिंदू( सिंधी व पंजाबी) लोकांवर अत्याचार होत आहे. डॉ. निमृता चंदानी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आल्याने शहरातील सिंधी समाजात प्रचंड रोष आहे. या अत्याचाराच्या विरोधात नागरिकांनी भारतीय सिंधू सभा व विदर्भ सिंधी विकास परिषदेच्या बॅनरखाली गुरुवारी जरीपटका येथील वसनशाह चौक येथे सभा घेऊन पाकिस्तानाच्या विरोधात रोष व्यक्त केला. समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना निवेदन सादर क रून पाकिस्तानातून विस्थापित होणाऱ्यांना केंद्र सरकारने आश्रय देण्याची मागणी केली.
जरीपटका येथील सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाची पंचायत, दरबारांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष घनश्याम कुकरेजा यांनी प्रास्ताविकातून पाकिस्तानात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा निषेध केला. या विरोधात सर्व सिंधी समाज एकजूट होईल असा विश्वास व्यक्त केला. सभेत ५० हून अधिक पंचायती व संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी मोहन मंजानी, दौलत तुंगवानी, घनश्याम गोदानी, दिलीप चावला, घोटकी पंचायतचे अध्यक्ष वलीराम सहजरामानी,आरएसएसचे अनिल भारद्धार, भगवानदास अडवाणी आदी उपस्थित होते.
सभेनंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. केंद्र सरकारने पाकिस्तानातील घटनांची दखल घ्यावी, मानवाधिकाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर उपस्थित करावा, पाकिस्तातून विस्थापित झाल्यास भारत सरकारने त्यांना मदत करावी, अशी मागणी केली.
शिष्टमंडळात घनश्याम कुकरेजा, मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, विदर्भ सिंधी विकास परिषदचे अध्यक्ष डॉ. विंकी रुखवानी, महासचिव पी.टी. दारा, नाग विदर्भ सिंधी सेंट्रल पंचायतचे अध्यक्ष सुरेश जग्यासी, भारतीय सिंधू सभेचे गोपाल खेमानी व प्रा. विजय केवलरामानी आदींचा समावेश होता.
पाक दूतावासाला घेराव करणार
भारतीय सिंधू सभेच्या देशभारात ३०० संस्था आहेत. सर्व ठिकाणी निदर्शने होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली जात आहे. नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथील पाकिस्तानच्या दूतावासाला घेराव घातला जाईल. अशी माहिती मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.
पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा
पाकिस्तानातील हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात गुरुवारी धरणे देण्यात आली. पंतप्रधान व गृहमंत्र्यांनी यात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यात आंतरराष्ट्रीय सिंधू सेवा संगम व नागपूर सेंट्रल सिंधी पंचायतचे अध्यक्ष प्रताप मोटवानी, समाजसेवी विजय केवलरामानी प्रदीप पंजवानी, उपाध्यक्ष कैलास केवलरामानी, महेश बठेजा, महासचिव विनोद जेठानी, कार्यकारी सचिव महेश ग्वालानी, प्रचार सचिव राजेश धनवानी, सचिव भारत पारवानी, मनीष दासवानी, ठाकूर आनंदानी, श्रीचंद चावला, राजेश बटवानी, राजू ढोलवानी, संतोष डेम्बला, कमल हरियाणी, सुरेश बुधवानी, विशाल कुमार, सुरेश खिलवानी, महेश मेघानी, घनश्याम लालवानी आदी सहभागी झाले होते.