गर्भलिंग निदान आणि तांत्रिक चुका करणाऱ्यांना एकच शिक्षा!
By admin | Published: August 22, 2015 03:04 AM2015-08-22T03:04:53+5:302015-08-22T03:04:53+5:30
गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याला आमचा विरोध नाही. कारवाईलाही विरोध नाही.
इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनने वेधले लक्ष: निदान करण्याची मागणी करणाऱ्यांवरही गुन्हा दाखल व्हावा
नागपूर : गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याला आमचा विरोध नाही. कारवाईलाही विरोध नाही. परंतु तांत्रिक चुका करणाऱ्यांना व गर्भलिंगनिदान करणाऱ्यांना एकाच प्रकारची शिक्षा होत असल्याने डॉक्टर व सोनोग्राफी सेंटर अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे, राज्यात या संदर्भातील सुमारे ४०० प्रकरणे समोर आली असताना यात ९० टक्के तांत्रिक चूक म्हणजे रजिस्टरवर योग्य नोंद न ठेवणे वगैरे कारणांवरून जबाबदार ठरविण्यात आले आहे. याचा गंभीरतेने विचार होणे आवश्यक आहे, तसेच यात दोषी डॉक्टरांसोबतच गर्भलिंग निदान करण्याची मागणी करणाऱ्या व्यक्तींवरही कारवाई व्हावी, अशी इंडियन रेडिओलॉजिकल इमेजिंग असोसिएशनची मागणी आहे.
या असोसिएशनचे विदर्भाचे नवनियुक्त अध्यक्ष व प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. प्रशांत ओंकार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. सुरेश चांडक, माजी अध्यक्ष डॉ. मधुसूदन सारडा व डॉ. हरीश चांडक यांनी लोकमतला सदिच्छा भेट दिली. त्यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यांमधील तांत्रिक चुका, त्रुटी आणि डॉक्टरांना होणारा त्रास या बद्दलचे आपले विचार मांडले.
डॉ. ओंकार म्हणाले, खूप चांगला उद्देश ठेवून हा कायदा केला आहे. परंतु दुर्दैवाने याचा उद्देश सफल झाला नसल्याचे दिसून येते. कारण दोन दशकांपूर्वी हा कायदा आल्यानंतरही मुलींचे प्रमाण घटले, हे त्याचे द्योतक आहे. मात्र याची झळ अनेक निरपराध डॉक्टरांना बसत आहे.
केवळ कागदोपत्री चुकांसाठी तुरुंगात जाण्याची वेळ येत असल्याने कित्येक ज्येष्ठ अनुभवी डॉक्टरांनी सोनोग्राफी करणेच बंद केले आहे तर काही बंद करण्याच्या विचारात आहे. सोनोग्राफी गर्भवती स्त्रियांसाठीच नव्हे तर एकंदरीत रुग्णसेवेसाठी वरदान असलेले सक्षम तंत्रज्ञान आहे. परंतु अर्धवट कायद्यामुळे या तंत्रज्ञानाची पुरती वाट लावली जात आहे, असेच म्हणावे लागेल. (प्रतिनिधी)