कोलेस्ट्रॉलवर रोजच्या गोळीपेक्षा आता महिन्यातून एकच इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 06:13 PM2023-01-09T18:13:19+5:302023-01-09T18:17:36+5:30
‘कार्डिओलॉजी अपडेट’मध्ये तज्ज्ञांची माहिती
नागपूर : भारतात गुंतागुंतीचे हृदयविकारांचे प्रमाण वाढण्यामागे ‘बॅड कोलेस्टेरॉल’ची पातळी हे एक मुख्य कारण ठरते. वेळीच लक्ष न दिल्यास हृदयविकाराचा झटका येण्याची जोखीम वाढते. ‘कोलेस्ट्रॉल’ नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित गोळी दिली जाते; परंतु, आता एकच इंजेक्शन तेही महिन्यातून एकदाच घेण्याची नवी उपचार पद्धती उपलब्ध झाली आहे, अशी माहिती रविवारी ‘कार्डिओलॉजी अपडेट’मध्ये सहभागी तज्ज्ञांनी दिली.
असोसिएशन ऑफ मेडिकल फॅकल्टीज आणि रिदम हार्ट अँड क्रिटिकल केअर आयोजित कार्डिओलॉजी आणि डायबेटिसमधील नवीन ‘अपडेट्स’चे आयोजन करण्यात आले. यावेळी सहभागी डॉक्टरांनी मधुमेहामुळे उद्भवणारे भविष्यातील धोके कमी करण्यासाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी आवश्यक असल्यावर भर दिला. शनिवारी या परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर आणि डॉ. अझीझ खान यांच्या हस्ते झाले.
- महिन्याकाठी एक इंजेक्शन, महत्त्वपूर्ण संशोधन
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनीष जुनेजा म्हणाले, कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक उपचारपद्धती आहे; परंतु, आता यात महिन्याकाठी देण्यात येणारे एक इंजेक्शन महत्त्वपूर्ण संशोधन आहे. पूर्वी याची किंमत पन्नास हजारांवर होती. आता तीस हजाराच्या घरात आली आहे. याची मागणी वाढल्यास किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
- रक्तदाबामुळे इतर अवयवांवरील जोखीम कमी करता येते
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पंकज राऊत म्हणाले की, रक्तदाबाला नियंत्रणात ठेवण्यासोबतच हृदय, मेंदू व किडणीवरील जोखीम कमी करणारी नवनवीन औषधी उपलब्ध होत आहेत. यामुळे रुग्णांनी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नवीन औषधोपचार आयुष्य वाढविण्यास मदत करतात.
- ४००हून डॉक्टरांचा सहभाग
असोसिएशन ऑफ मेडिकल फॅकल्टीज नागपूरचे अध्यक्ष डॉ. प्रसाद झोडे म्हणाले की, ‘कार्डिओलॉजी अपडेट’मध्ये ४००हून अधिक डॉक्टर सहभागी झाले. या परिषदेतून हृदयरोग व मधुमेहावरील नवीन उपचार व औषधांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. शैक्षणिक कार्यक्रमात मुंबई, दिल्ली, अहमदाबाद व हैदराबाद येथील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.