सिंगल लेनवरच दिला अस्थायी डिव्हायडर ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:26 AM2020-12-14T04:26:36+5:302020-12-14T04:26:36+5:30
वळणावरच अतिक्रमण : वाहतूक होतेय विस्कळीत नागपूर : मानकापूर चौक ते सादिकाबादकडे जाणाऱ्या सिंगल लेनवर बॅरिकेडस् लावून डिव्हायडर तयार ...
वळणावरच अतिक्रमण : वाहतूक होतेय विस्कळीत
नागपूर : मानकापूर चौक ते सादिकाबादकडे जाणाऱ्या सिंगल लेनवर बॅरिकेडस् लावून डिव्हायडर तयार करण्यात आले आहे. चौकाच्या या वळणाला रुंद करायचे सोडून येथे अतिक्रमण करून सिंगल लेनच्या रोडच्या कडेपर्यंत वाहने उभी करण्यात येत आहेत. वळण रस्त्याच्या भागातच पानठेले, चहा-नाश्त्याची दुकाने आहेत. तर दुसरीकडे स्थायी दुकानात येणारे ग्राहक रस्त्यापर्यंत आपल्या वाहनांची पार्किंग करीत आहेत.
मानकापूर स्टेडियम चौक ते सादिकाबादपर्यंत स्टेडियमच्या भिंतीला लागून मनमानी पद्धतीने अतिक्रमण करण्यात येत आहे. महापालिकाही येथे नावापुरती कारवाई करते. अशास्थितीत वाहतूक विस्कळीत करून व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे मनसुबे उंचावले आहेत. जाणकारांच्या मते, आता या रस्त्यावरून चारचाकी वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे हा रस्ता रुंद करणे गरजेचे आहे. उपेक्षा आणि बेजबाबदारपणामुळे या वळणावर पानठेले सुरू होत आहेत, तर कुठे कबुतरखाने सुरू करण्यात आले आहेत. सायंकाळ होताच या जागेला चौपाटीसारखे स्वरूप प्राप्त होते. स्टेडियम गेटच्या बाजूला वळणाच्या ठिकाणाला रुंद न केल्यास येथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. चहाटपरी आणि चौपाटी सुरू करण्याऐवजी येथे नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे महापालिकेने याकडे लक्ष न दिल्यामुळे रस्त्याच्या सुरक्षा भिंतीपर्यंत अनेक ठिकाणी भंगारातील वाहने जमा करण्यात येत आहेत.
...............