coronavirus; एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 11:30 AM2020-03-19T11:30:07+5:302020-03-19T11:31:02+5:30
एसटी महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
दयानंद पाईकराव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांमध्ये जनजागृतीसह इतर महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात एक पाऊल पुढे टाकत एसटी महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल केला असून आता एसटीच्या एका सीटवर एकच प्रवासी बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘सुरक्षित अंतर ठेवा योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रवाशांच्या बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. प्रवाशांना सुरक्षित अंतर ठेवून प्रवास करण्याच्या दृष्टीने काही आसने बैठक व्यवस्थेसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही बसमधून उभे राहून प्रवास करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयात धडकला आहे. या निर्णयानुसार संपूर्ण बसमध्ये बसच्या क्षमतेच्या केवळ ५० टक्केच प्रवासी बसवून ती मार्गावर सोडण्यात येणार आहे. आवश्यकता वाटल्यास जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. एसटी बसमध्ये समाजातील विविध घटकांसाठी राखीव आसनांवरील आरक्षण या स्थितीत रद्द करण्यात आले आहे. या निर्णयामुळे यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्यापैकी यश मिळेल, असा विश्वास एसटी महामंडळाने व्यक्त केला आहे. एक जबाबदार सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटी महमंडळाने यापूर्वीच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.
यात बसस्थानक दिवसातून दोन ते तीन वेळा सॅनिटायझर वापरून स्वच्छ धुणे, प्रत्येक बस लिक्विड मिश्रित पाण्याने धुणे, गर्दीच्या ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाºया एसटी कर्मचाऱ्यांना मास्क व लिक्विडची बॉटल देणे आणि बसस्थानकावरील उद्घोषणा प्रणालीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करणे सुरु केले आहे. यात एकाच सीटवर एक प्रवासी बसविण्याच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाने एक स्तुत्य निर्णय घेऊन ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे आपले ब्रीदवाक्य खरे ठरविले आहे.