‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:07 AM2021-06-04T04:07:10+5:302021-06-04T04:07:10+5:30

नागपूर : कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची झळ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोसावी लागत आहे. घरातील परिस्थिती मुलांना ...

‘Sir, I can't afford online education’ | ‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो’

‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो’

Next

नागपूर : कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याची झळ लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सोसावी लागत आहे. घरातील परिस्थिती मुलांना अस्वस्थ करीत असून, त्यांनी बाल हट्टही सोडले आहेत. घरात भासत असलेल्या आर्थिक चणचणीपोटी सहाव्या वर्गातील एका विद्यार्थिनीने मुख्याध्यापकांना पत्र लिहून, ‘सर, मला ऑनलाईन शिक्षण परवडत नाही हो...’ अशी खंत व्यक्त केली आहे. सहाव्या वर्गातील या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हे पत्र वाचून प्रत्येकजण हळहळ व्यक्त करतोय.

लोकमत प्रतिनिधीला हे पत्र मिळाले. ही विद्यार्थिनी श्री सत्यसाई विद्यामंदिर, अंबिकानगर, नरसाळा रोड येथील सहाव्या वर्गात शिकणारी आहे. इशिका भाजे असे तिचे नाव. यासंदर्भात शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आले की, इशिका काही दिवसांपासून शाळेत सुरू असलेल्या ऑनलाईन वर्गात उपस्थित राहत नव्हती. तेव्हा शिक्षकांनी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून कारण विचारण्यास सांगितले. तर इशिकाने मुख्याध्यापकांच्या नावाने स्वत:च्या हस्ताक्षरात पत्रच पाठविले. पत्रात तिने सांगितले की माझ्या आई-वडिलांचा रोजगार बंद झाला आहे. त्यामुळे कमावण्याचे साधन कुठलेच नाही. आम्ही दोन भावंडे आहोत, ऑनलाईन शिक्षणासाठी दोघांसाठी दोन मोबाईल विकत घ्यावे लागले. पण रिचार्जचा खर्च महिन्याला ८०० ते १००० रुपये येतो आहे. हा खर्च नियमित शाळेत सुद्धा होत नाही. वडिलांचा रोजगार बंद असल्यामुळे इतका खर्च आम्हाला शक्य नाही. आम्हाला परवडेल अशी उपाययोजना आपण करावी, शाळेला अडचण असेल तर शासनातर्फे काही मदत होईल का? असाही प्रश्न तिने उपस्थित केला.

- इशिकाचे पत्र मिळाल्यानंतर वाईट वाटले. ती हुशार मुलगी आहे. आम्ही तिला नक्कीच मदत करणार आहे. तिच्या अडचणी सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

निलेश सोनटक्के, मुख्याध्यापक, श्री सत्यसाई विद्यामंदिर

ईशिकाचे पत्र एक उदाहरण आहे

ही बातमी केवळ इशिकाची नाही. इशिकासारखे अनेक विद्यार्थी आज शिक्षणापासून दूर जात आहेत. त्यामुळे इशिकाच्या पत्राची दखल घेण्याची गरज आहे. आरटीईचा कायदा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा आहे. इशिकासारख्या अनेकांसाठी मोफत शिक्षणाची सोय होणे गरजेचे आहे.

Web Title: ‘Sir, I can't afford online education’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.