सर...लहान मुले किडनॅप झाली तर काय करावे...? विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांकडून जाणून घेतली पोलीस विभागाची कार्यप्रणाली
By योगेश पांडे | Published: November 28, 2024 11:44 PM2024-11-28T23:44:21+5:302024-11-28T23:44:36+5:30
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाचा तपास, काम करण्याची प्रणाली याबाबत जाणून घेतले.
नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी ‘थँक्स गिव्हिंग डे’ निमित्ताने आयोजित कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी पोलीस विभागाचा तपास, काम करण्याची प्रणाली याबाबत जाणून घेतले. वाहतुकीचे नियम पाळणे का आवश्यक आहे हे जाणून घेत असतानाच विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांना लहान मुले किडनॅप झाली तर काय करावे असे प्रश्न विचारत सुरक्षेबाबतदेखील ते किती दक्ष आहे हे दाखवून दिले.
पोलीस भवनात आयोजित या कार्यक्रमात सहावी ते आठवीदरम्यानचे ३० शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकमेकांबद्दल कृतज्ञ कसे राहावे व जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा हे सांगितले. ‘थॅक्स गिव्हिंग डे’ हा एकमेकांबाबत आभार व्यक्त करण्याचा दिवस असतो. आभार व्यक्त केल्याने नातेसंबंध घट्ट होतात, मानसिक व शारीरिक आरोग्य सुधारते आणि तणाव कमी होतो, असे ते म्हणाले. पोलीस तपास कसा करतात ? पोलीस घटनास्थळी पुरावे कसे गोळा केले जातात? डिजिटल पुरावे आणि त्यांचा उपयोग काय?सुरक्षेबाबत टिप्स कोणत्या? सोशल मीडियाचा गैरवापर झाल्यास काय करावे? इत्यादी प्रश्न यावेळी मुलांनी उपस्थित केली.
विद्यार्थ्यांनी बनावे ‘छोटा पोलीस’
विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा पोलिसांबाबत भिती असते. मात्र ही भिती दूर सारून मुलांनीदेखील ‘छोटा पोलीस’ बनून मदत केली पाहिजे. पालकांनी वाहतुक नियमांचे पालन केले नाही तर घरी त्यांना दंड लावा असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.