बहिणीने बहिणीला दिले जीवनदान
By admin | Published: March 9, 2017 10:52 PM2017-03-09T22:52:52+5:302017-03-09T22:52:52+5:30
मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३४ वर्षीय बहिणीला तिच्याच लहान बहिणीने स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले. बुधवारी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 9 - मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या ३४ वर्षीय बहिणीला तिच्याच लहान बहिणीने स्वत:ची किडनी दान करून जीवनदान दिले. बुधवारी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बहिणीने दिलेल्या या अवयवाचे यशस्वी प्रत्यारोपण झाले. ह्यसुपरह्णमधले हे अकरावे यशस्वी किडनी प्रत्यारोपण आहे.
बहिणीला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारी सोनु सुरेंद्र डोंगरे (३३) रा. यशोधरानगर असे लहान बहिणीचे नाव आहे तर मोठ्या बहिणीचे नाव डॉ. मोना गायकवाड (३४) आहे. कुही-मांडळ येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. मोना गायकवाड कार्यरत आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून त्यांना किडनीचा आजार आहे. नोव्हेंबर २०१६ पासून त्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलिसीस घेत आहे. मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त आपल्या बहिणीच्या जीवासाठी लग्न झालेली लहान बहीण सोनू डोंगरे हिने पुढाकार घेतला. त्यांना दोन मुले असतानाही बहिणीला मूत्रपिंड दान करून वाचवण्याचा निश्चय केला. यात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मदतीला धावून आली. या शस्त्रक्रियेसाठी येणारा सर्व खर्च या योजनेतून करण्यात आला. हे यशस्वी किडनी प्रत्यारोपण मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात युरो सर्जन डॉ. संजय कोलते, डॉ. धनंजय सेलूकर, डॉ. कुणाल मेश्राम, डॉ. अमित, डॉ. नीलेश नागदिवे, नेफ्रॉलॉजिस्ट विभाग प्रमुख डॉ. चारुलता बावनकुळे, डॉ. विशाल रामटेके, भूलतज्ज्ञ डॉ. विजय श्रोते, डॉ. अमोल ठाकरे, डॉ. योगेश झंवर, डॉ. गगन अग्रवाल व मूत्रपिंड प्रत्यारोपण समन्वयक डॉ. मोहम्मद मेहराज शेख यांनी परिश्रम घेतले.
दोन्ही बहीणींची प्रकृती स्थिर
एकीकडे नात्या-नात्याला तडे जात असताना लग्न झालेल्या बहिणीला स्वत:ची किडनी दान करण्याची सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधली ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्यारोपणात आईने मुलाला, बहिणीने भावाला, वडिलाने मुलाला तर पत्नीने पतीला मूत्रपिंड दान केले आहे. विशेष म्हणजे, डॉ. गायकवाड यांचे मूत्रपिंड प्रत्यारोपण तीन वेळा विविध कारणाने टळले. अखेर चौथ्या प्रयत्नात यशस्वी झाले. सध्या दोन्ही बहिणींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.