सीताबाईंनी बांगड्या विकून घडविली मुले ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:46+5:302021-05-09T04:07:46+5:30
नागपूर : पतीची नोकरी गेली. घरची परिस्थिती हलाखीची, परंतु परिस्थितीशी चार हात करून सीताबाई गोन्नाडे यांनी हिंमत खचू दिली ...
नागपूर : पतीची नोकरी गेली. घरची परिस्थिती हलाखीची, परंतु परिस्थितीशी चार हात करून सीताबाई गोन्नाडे यांनी हिंमत खचू दिली नाही. दिवसभर टोपलीत बांगड्या घेऊन विकायच्या, सायंकाळी घरची कामे करायची अन् रात्री हॉटेलमध्ये स्वयंपाक करायचा. आपल्या मेहनतीच्या भरवशावर त्यांनी दोन्ही मुले, मुलीला उच्च शिक्षण दिले आणि आज त्या सन्मानाचे जीवन जगत आहेत.
सीताबाई गोन्नाडे (६१) असे या माउलीचे नाव आहे. सीताबाईचे पती शिवशंकर गोन्नाडे सूत गिरणीत कामाला होते. परंतु, सूतगिरणी बंद पडल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली. घरगाडा कसा चालवायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. अशा स्थितीत सीताबाईंनी कंबर कसली. बांगड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. टोपलीत बांगड्या घेऊन दिवसभर त्या वणवण फिरायच्या. सायंकाळ झाली की, घरी येऊन स्वयंपाक आणि घरची कामे करायच्या. मुलांच्या शिक्षणालाही त्यांनी प्रोत्साहन दिले. आज त्यांचा प्रवीण नामक मुलगा मेडिकल स्टोअर चालवितो. अनिल नामक मुलाची थ्री-जी असोसिएट नावाची कंपनी आहे. मुलगी तृषालीने एलएलबी पूर्ण केले असून, ती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात क्लार्क म्हणून कामाला आहे. केवळ मुलेच नव्हे, तर सुनांनाही त्यांनी शिक्षणासाठी प्रेरित केले. लग्न झाल्यानंतर सीताबाईंनी सुनेला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांची सून मनीषा एमबीए झाली. आता एमपीएससीची तयारी करीत आहे. सीताबाईंनी केलेल्या कष्टाचे चीज झाले असून, आज त्यांचे कुटुंब सन्मानाने जीवन जगत आहे.
...............