वर्षभर दररोज सुरू राहावा सीताबर्डी किल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:20 AM2019-08-08T01:20:17+5:302019-08-08T01:21:34+5:30
संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संत्रानगरीतील ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला हा केवळ राष्ट्रीय दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट व २६ जानेवारीलाच सुरू राहतो. हा ऐतिहासिक वारसा आहे आणि नागपूरकरांची संपत्ती आहे. त्याचा इतिहास मनामनात रुजावा यासाठी हा किल्ला वर्षभर दररोज सुरू राहावा, अशी मागणी पुढे येत आहे. नागपूरकरांनी ही मागणी लावून धरावी यासाठी डॉ. हेमंत जोशी व अर्चना जोशी जनजागृती अभियान राबवित आहे.
सीताबर्डी किल्ल्याचे नाव घेताच आठवते ती किल्ल्याची लढाई. या लढाईला आता २०१ वर्षे पूर्ण होत आहेत. टेकडीवर ईस्ट इंडिया कंपनीच्या २४ व्या रेजिमेंटच्या सैन्याचा डोळा होता. नागपूर जिंकण्यासाठी या टेकडीचे महत्त्व लक्षात घेता, इंग्रज अधिकाऱ्यांनी २५ नोव्हेंबर १८१७ रोजी युद्धाला सुरुवात केली. राजे आप्पासाहेब भोसले यांनी युद्धात नेतृत्व करीत होते. त्यांच्या सैन्याने तीन दिवस ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी कडवी झुंज दिली. मात्र इंग्रजांसमोर त्यांना पराभव पत्करावा लागला. लढाईनंतर ही टेकडी इंग्रज लष्कराच्या ताब्यात गेली आणि भारतात खऱ्या अर्थाने ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली. ब्रिटिशांनी टेकडीवर असलेल्या आऊटपोस्टच्या ठिकाणी जानेवारी १८२२ मध्ये किल्ल्याची तटबंदी पूर्ण केली. स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना १० एप्रिल ते १५ मे १९२३ या काळात या किल्ल्यातील तुरुंगात डांबून ठेवले होते. १८५७ च्या क्रांतीमध्ये सहभागी टिपू सुलतान यांचे नातू नवाब कादर अली व त्यांच्या आठ सहकाऱ्यांना इंग्रजांनी येथे फाशी दिली होती. सध्या हा किल्ला भारतीय सैन्याच्या ताब्यात असून येथे ११८ इन्फन्ट्री बटालियन (प्रादेशिक सेना) ग्रेनेडियर्सचे वास्तव्य आहे. सैन्याने या सर्व आठवणी सांभाळून ठेवल्या आहेत.
सीताबर्डी किल्ल्यावर मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाचे म्युझियम व्हावे, युद्धस्मारक तयार व्हावे. दिल्लीचा लाल किल्ला, पुण्याचा शनिवार वाडा, ग्वाल्हेर, हैद्राबादचा किल्ला अशा सगळीकडे किल्ला रोज बघता येतो. तेथील किल्ल्यावर साऊंड आणि लाईट शो च्या माध्यमातून, ऐतिहासिक गोष्टींवर प्रकाश टाकला जातो तसा सीताबर्डी किल्ल्यावर व्हावा. त्यामुळे नागपूरचे पर्यटन वाढेल, असे मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केले. किल्ल्याचा परिसर हा ८७० एकरामध्ये पसरला आहे. एवढ्या परिसरात बटालियनचे केवळ १०-१२ जवान तैनात आहेत. सामान्यांसाठी दररोज किल्ला खुला झाला तर दररोज फिरता येईल आणि इतिहास जाणता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यासाठी शहरातील नागरिकांनी ही मागणी लावून धरावी, असे आवाहन त्यांनी केले.