बैठी जीवनशैली, जंक फूड मधुमेहाला पूरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 01:07 PM2019-03-18T13:07:11+5:302019-03-18T13:07:36+5:30
जंक फूड, फास्ट फूडचे प्रमाण खाद्यपदार्थामध्ये वाढल्यामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीरात ‘फॅट्स’ वाढू लागले आहेत. परिणामी, प्रचंड सुटलेले शरीर, लहान वयात होणारे मधुमेह, हृदयरोग या समस्यांना आजच्या पिढीला सामोरे जावे लागत आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय पाणीकर यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अंगमेहनतीची कामे करण्याची श्रम संस्कृती जाऊन बैठी कामे करण्याची जीवनशैली आपण स्वीकारल्यामुळे वजन वाढण्याची समस्या गेल्या काही वर्षात सतत वाढत आहे. त्याच्या जोडीला जंक फूड, फास्ट फूडचे प्रमाण खाद्यपदार्थामध्ये वाढल्यामुळे व व्यायामाच्या अभावामुळे शरीरात ‘फॅट्स’ वाढू लागले आहेत. परिणामी, प्रचंड सुटलेले शरीर, लहान वयात होणारे मधुमेह, हृदयरोग या समस्यांना आजच्या पिढीला सामोरे जावे लागत आहे, असे मत मधुमेहतज्ज्ञ डॉ. विजय पाणीकर यांनी व्यक्त केले.
डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया व अॅकडमी ऑफ मेडिकल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. राजीव व संजीव वऱ्हाडपांडे स्मृती व्याख्यानमालेत ते इन्सुलिन व मधुमेहावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते.
डॉ. पाणीकर म्हणाले, मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणापैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरु पात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहे. परंतु मधुमेहाच्या उंबरठ्यावर असणारे, ज्यांना मधुमेह आहे ते स्वत: आणि ज्यांना मधुमेहाविषयी माहिती आहे ते सुद्धा याला गंभीरतेने घेत नाही.
डॉ. पाणीकर म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे आणि खानपानामुळे हल्ली लहान मुलांमध्ये लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा मुलांना मधुमेह होण्याची दाट शक्यता असते. पूर्वी चाळिशी ओलांडल्यावर मधुमेहाचे रु ग्ण दिसून येत. मात्र, गेल्या पाच सहा वर्षांत २५ ते ३० या वयोगटातील युवकांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: शहरात हे प्रमाण मोठे आहे, असेही ते म्हणाले.
व्याख्यानमालेनंतर डा. परिमल तयाडे यांनी मधुमेहाचा आव्हानात्मक बाबी सादर केल्या. गटचर्चेत डॉ. निर्मल जयस्वाल, डॉ. सचिन गुप्ता, डॉ. किरण बेलसरे व डॉ. सुनील गुप्ता यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. जनजागृती कार्यक्रमात डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. सचिन सूर्यवंशी, डॉ. विजय पाणीकर आदींनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. संचालन डॉ. संकेत पेंडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. सचिन सुर्यवंशी, सचिव डॉ. प्रशांत गोवर्धन, अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सचे अध्यक्ष डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. अजय अंबाडे व व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. किरण कुळकर्णी यांनी सहकार्य केले.