पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 10:57 AM2022-06-13T10:57:45+5:302022-06-13T10:58:05+5:30

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला.

Situation under control in Maharashtra due to strict police surveillance says Dilip Walse Patil | पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

पोलिसांच्या कठोर निगराणीमुळे महाराष्ट्रात परिस्थिती नियंत्रणात : दिलीप वळसे पाटील

Next
ठळक मुद्दे'शक्ती'तील त्रुटी पूर्ण करून शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे पाठवू : गृहमंत्री

नागपूर : नूपुर शर्मा प्रकरणात पोलिसांनी नियोजनबद्ध योजना आखली. सर्व समाज घटकांशी चर्चा करून शांततेचे आवाहन करण्यात आले. सर्व घटकांनी यात चांगला प्रतिसाद दिल्यामुळे महाराष्ट्रात अद्याप कुठलीही दंगल घडली नाही, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी येथे केले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलनागपूर दौऱ्यावर आले असताना पत्रकारांनी रविभवन येथे त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, नूपुर शर्मा प्रकरणात महाराष्ट्रात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या हालचालीवर बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. राज्यात आजपर्यंत जेथे-जेथे दंगली घडल्या तेथील असामाजिक तत्त्वांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. शक्ती कायदा राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता; परंतु राष्ट्रपती कार्यालयाने या कायद्यात काही त्रुटी काढून हा कायदा परत पाठविला आहे. लवकरच यातील त्रुटी पूर्ण करून हा कायदा परत राष्ट्रपतींकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. कन्हान येथे कराटे प्रशिक्षकाने बलात्कार केल्याच्या प्रकरणात जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात नेहमीच कैद्यांचा मृत्यू, मोबाइल सापडण्याच्या घटना घडतात, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले. त्यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, नागपूर कारागृह दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा प्रस्ताव आहे. तुरुंगात होणाऱ्या गैरव्यवहारांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक पाठवून योग्य ती चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तंटामुक्ती अभियान पुनर्जीवित करणार

तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात सुरू असलेले तंटामुक्त गाव अभियान पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव आल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले, या योजनेचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. त्यामुळे ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी जोरकस प्रयत्न करण्यात येत आहेत.

नक्षल्यांच्या बंदोबस्तासाठी छत्तीसगडनेही प्रयत्न करावेत

नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात पोलिसांच्या कारवाईमुळे नक्षलवादी चळवळीवर मोठा परिणाम झाला आहे. महाराष्ट्र पोलिसांनी कठोर कारवाई करून नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सीमेपर्यंत हुसकावून लावले आहे. आता छत्तीसगड पोलिसांनीही नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Situation under control in Maharashtra due to strict police surveillance says Dilip Walse Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.