सहा आराेपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:09 AM2021-01-22T04:09:49+5:302021-01-22T04:09:49+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : जागेच्या मालकी हक्कावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्यातून तरुणाची चाकूने गळा चिरून हत्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : जागेच्या मालकी हक्कावरून उद्भवलेला वाद विकाेपास गेला आणि त्यातून तरुणाची चाकूने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) येथे बुधवारी रात्री घडली असून, या खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहा आराेपींना घटनेनंतर काही तासातच अकाेला जिल्ह्यातील बाेरगाव (मंजू) येथून ताब्यात घेत अटक केली
कासीम अयुब पठाण (३८), आशिष सुरेश भड (३१), सुलतान रहीम कनोजे (२०) व आनंद रामभाऊ शिंदे (३०) चाैघेही रा. खापरखेडा, ता. सावनेर, सागर कृष्णराव माहुरकर (३०, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) व सुधीर भागवत पिंपळे (३६, रा. शिवराम नगर, चनकापूर, ता. सावनेर) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. प्रशांत घाेडेस्वार व सुधीर पिंपळे या दाेघांनीही खापरखेडा येथील मुख्य मार्गालगत असलेल्या सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून खाेल्यांचे बांधकाम केले. त्या जागेच्या मालकी हक्कावरून दाेघांमध्ये तीन महिन्यांपासून वाद सुरू हाेता.
सुधीरने त्या जागेवर माताेश्री पान पॅलेस नावाचे दुकान सुरू केले. ते लाॅकडाऊनच्या आधीपासून बंद असल्याने त्या दुकानासमाेर प्रशांतने चायनीज फूड सेंटर सुरू केले आणि तिथे एका मुलाला नियुक्त केले. सुधीरने ती जागा कासीमला विकल्याने कासीमने तिथे पक्के बांधकाम करून जुगार सुरू करण्याची याेजना आखली. आनंद शिंदेलाही त्या जागेचा वापर करायचा हाेता. त्या जागेचा ताबा साेडण्यासाठी प्रशांतने आराेपींना ५० हजार रुपयांची मागणी केली हाेती. त्यात वाद उद्भवल्याने सुधीरने प्रशांतच्या कानशीलावर हाणली.
त्यातच प्रशांतने सुधीरच्या हातावर चाकूने वार केला. त्यामुळे इतरांनी प्रशांतला मारहाण करायला सुरुवात केली. कासीमने प्रशांतला पकडले तर सुलतानने चाकूने त्याचा गळा चिरला. ताे जखमी अवस्थेत काेसळताच आनंद घरी निघून गेला तर अन्य आराेपी चारचाकी वाहनाने शेगावच्या दिशेने गेले. दरम्यान, खापरखेडा पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. त्यातच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करीत आराेपींना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार, सहाय्यक पाेलीस निरीक्षक राजू कर्मलवार व जितेंद्र वैरागडे, उपनिरीक्षक जावेद शेख, सहाय्यक फौजदार लक्ष्मीप्रसाद दुबे, विनोद काळे, रामा आडे, अरविंद भगत, सत्यशील कोठारे, राजू रेवतकर, वीरेंद्र नरड, रोहन डाखोरे, सतीश राठोड यांच्या पथकाने केली.
....
मृत व आराेपींची बैठक
सुधीरने ती अतिक्रमित जागा एक लाख रुपयांमध्ये जानेवारीमध्ये कासीमला विकली हाेती. कासीमने तिथे पक्के बांधकाम केले आणि प्रशांतचा चायनीज फॅुडचा हातठेला बाजूला केला. सागर माहुरकर हा बांधकाम कंत्राटदार असल्याने त्याने या जागेवर कार्यालय सुरू करण्याची याेजना आखली हाेती. आनंद शिंदेही याच बांधकामाच्या शेजारी जुगार सुरू करण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी करणार हाेता. आनंद जुगारचा मालक असून, प्रशांत त्याच्याकडे जुगार चालवायचा. जागेचा तिढा साेडविण्यासाठी प्रशांत व आराेपींची काही दिवसांपूर्वी बैठक झाली. त्या बैठकीत जागेचा ताबा साेडण्यासाठी प्रशांतने ५० हजार रुपयांची मागणी केली हाेती.
....
गळा चिरण्याचे ट्रेंड
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने आराेपींच्या माेबाईलचे लाेकेशन ट्रेस करायला सुरुवात केली. त्यानुसार त्यांनी आराेपींचा पाठलाग केला. त्यांना अकाेला जिल्ह्यातील बाेरगाव (मंजू) येथे अडवून अटक केली आणि खापरखेडा पाेलिसांच्या स्वाधीन केले. गळा चिरून खून करण्याचा अलीकडच्या काळात खापरखेडा परिसरात टेंड झाला आहे. खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा प्रकारच्या खुनाची ही तिसरी घटना हाेय. यापूर्वी चनकापूर येथे गदा व मागील वर्षी अश्विन ढाेणे या दाेघांचा गळा चिरून खून करण्यात आले. दाेघेही सराईत गुन्हेगार हाेते.