पती, सासूसह सहा आरोपींना दोन वर्षे कारावासाची शिक्षा, विवाहितेच्या छळाचा खटला
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: February 19, 2024 04:52 PM2024-02-19T16:52:30+5:302024-02-19T16:53:40+5:30
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गरिमा बागरोडिया यांनी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदानमधील आहे.
राकेश घानोडे, नागपूर : विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ करणाऱ्या पती व सासूसह सहा आरोपींना भादंवितील कलम ४९८-ए अंतर्गत प्रत्येकी दोन वर्षे सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दहा दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी गरिमा बागरोडिया यांनी हा निर्णय दिला. ही घटना गिट्टीखदानमधील आहे.
आरोपींमध्ये पती कन्हैय्या नारायण बौरसिया (४०), सासू गीता (६८), दिर कुंदनलाल (३३), दिराची पत्नी सीमा (४०), चुलत सासरा किशोर बौरसिया (५९) व चुलत सासू अनिता बौरसिया (४५) यांचा समावेश आहे. पीडित विवाहितेचे नाव माधुरी आहे. तिचे व कन्हैय्याचे ६ फेब्रुवारी २०१० रोजी लग्न झाले. दरम्यान, पाच-सहा महिने तिला चांगले वागविण्यात आले. त्यानंतर पती दारू पिऊन तिला मारहाण करायला लागला. इतर आरोपी त्याला चिथावणी देत होते. माधुरीला माहेरून पैसे आणण्याची मागणी केली जात होती. पैसे न आणल्यास तिचा छळ केला जात होता. त्यामुळे तिने २६ फेब्रुवारी २०१४ रोजी गिट्टीखदान पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. अमृता सोले-पंडित यांनी कामकाज पाहिले.
पाच लाख रुपये भरपाई मंजूर :
न्यायालयाने माधुरीला पाच लाख रुपये भरपाई मंजूर केली व आरोपींनी तिला ही रक्कम दोन महिन्यात द्यावी, असे निर्देश दिले. तसेच, दोन महिन्यात ही रक्कम देण्यात अपयश आल्यास त्यानंतर या रकमेवर वार्षिक ७ टक्के व्याज लागू होईल, असे स्पष्ट केले. याशिवाय दंडाचे १८ हजार रुपये देखील माधुरीलाच द्यावे, असे सरकारला सांगितले.