नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2020 11:31 PM2020-05-02T23:31:13+5:302020-05-03T00:00:54+5:30

प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली.

Six and a half lakh turns from a woman's bank account in Nagpur: Cyber criminal act | नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य

नागपुरात महिलेच्या बँक खात्यातून साडेसहा लाख वळते : सायबर गुन्हेगाराचे कृत्य

Next
ठळक मुद्देप्रतापनगरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रतापनगरातील एका सुखवस्तू कुटुंबातील महिलेच्या खात्यातून सायबर गुन्हेगाराने केवायसी करण्याच्या नावाखाली चक्क ६ लाख ५० हजार रुपयांची रक्कम वळती करून घेतली. तर हिंगणा मार्गावरील बालाजीनगरात राहणाऱ्या एका व्यक्तीचे २२ हजार रुपये लंपास केले. प्रतापनगर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडून शनिवारी सायंकाळी उघड झाली.

सुभाषनगरातील नेल्को सोसायटीत केतकी अमित थत्ते (वय ४४) राहतात. त्यांचे पती कंत्राटदार आहेत तर त्या गृहिणी असल्याचे पोलीस सांगतात.
२८ एप्रिलला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये पेटीएम अ‍ॅप डाऊनलोड केले. त्यांना केवायसी व्हेरिफिकेशन करणे जमले नाही त्यामुळे ते तसेच ठेवले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर ८५३७८९१४५९ या नंबरवरून फोन आला. आपण पेटीएम कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सायबर गुन्हेगाराने सांगितले. मी तुम्हाला पेटीएम व्हेरिफिकेशन करून देतो, असे म्हणून त्याने थत्ते यांना मोबाईलवर एक लिंक पाठविली. थत्ते यांनी ती लिंक डाऊनलोड केली. मात्र त्यात त्यांना आरोपीने सांगितलेली माहिती नमूद करता आली नाही. त्यामुळे आरोपीने त्यांचा दुसरा मोबाईल नंबर मागितला. त्या नंबरवर फोन करून फिर्यादीचे पेटीएम केवायसी व्हेरिफिकेशन झाल्याचे सांगून त्यांना त्यांच्या क्रेडिट कार्डमधून पेटीएममध्ये १०० रुपये भरण्यास सांगितले. थत्ते यांनी शंभर रुपये जमा केले असता आरोपीने त्यांना एक लिंक पाठविली आणि त्यावरचा ओटीपी नंबर, एक्सपायरी तारीख विचारून घेतली. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पंधरा मिनिटात ६ लाख ४९ हजार ९९९ रुपये काढून घेतले.

हा प्रकार लक्षात आल्यावर थत्ते हादरल्या. त्यांनी प्रतापनगर पोलीस आणि नंतर सायबर शाखेत धाव घेतली. बँंकेच्या अधिकाºयांसोबतही संपर्क साधला. वेळीच हालचाल झाल्यामुळे आरोपीने ट्रान्सफर केलेल्या खात्यातील सुमारे पाच लाख रुपयांची रक्कम फ्रीज करण्यात आली. त्यामुळे थत्ते यांची ही रक्कम बचावली. उर्वरित रक्कम मात्र आरोपीने लंपास केली. या प्रकरणी शनिवारी प्रतापनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, एमआयडीसीत ८ एप्रिलला अशीच घटना घडली. हिंगणा मार्गावरील बालाजीनगरमध्ये राहणारे संतोष भास्कराव म्हसकर (वय ५२) यांच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगाराचा फोन आला. पेटीएम कस्टमर केअर म्हणून बोलत असल्याचे सांगून आरोपीने म्हसकर यांना बँंक खात्याची माहिती विचारली. नंतर काही वेळेतच त्यांच्या एचडीएफसी बँक एमआयडीसी शाखा नागपूर येथील दोन अकाऊंटमधून २२,८०३ रुपये पेटीएममार्फत काढून घेतले. म्हसकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर शाखेने चौकशी केल्यानंतर आज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


कानपूरच्या बँकेत रक्कम वळती

थत्ते यांच्या खात्यातून आरोपीने कानपूर(उत्तर प्रदेश)मधील सिंडिकेट बँकेच्या एका खात्यात रक्कम वळती केली होती. आरोपीने थत्ते यांना फसविण्यासाठी जो मोबाईल वापरला, तो बिहारमधील असल्याचे समजते. बिहार झारखंडच्या सीमेवर जामतारा गावात सायबर गुन्हेगारांची टोळी बसली आहे. ही टोळी अशाप्रकारे देशातील अनेकांना रोज लाखोंचा गंडा घालते. मात्र पोलिसांच्या हाती ही टोळी अपवादानेच लागते. दोन वर्षापूर्वी जामताऱ्याच्या अशाच एका टोळीतील आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाने यश मिळवले होते. मात्र त्यानंतर हजारो लोकांची फसवणूक झाली. परंतु गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

Web Title: Six and a half lakh turns from a woman's bank account in Nagpur: Cyber criminal act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.