विधानसभेच्या रिंगणात भाजपचे सहा खासदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:09 AM2021-03-15T04:09:21+5:302021-03-15T04:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोलकाता : पश्चिम बंगाल व केरळमधील निवडणुकांत भाजपने चक्क पाच खासदारांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल व केरळमधील निवडणुकांत भाजपने चक्क पाच खासदारांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधील चार, तर केरळमधील दोन खासदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो हेदेखील विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने तिसऱ्या व चौथ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी अनुक्रमे २७ व ३८ उमेदवारांची नावे घोषित केली. यात केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, लॉकेट चॅटर्जी, स्वपन दासगुप्ता व निसिथ प्रामाणिक यांचा समावेश आहे. आसनसोल येथून खासदार असलेले सुप्रियो हे कोलकाता येथील टॉलिजंग येथून निवडणूक लढतील. सुप्रियो यांच्यासमोर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय अरुप बिस्वास यांचे आव्हान आहे, तर अभिनय क्षेत्रातून राजकारणात आलेले लॉकेट चॅटर्जी हे हुगली जिल्ह्यातील चुंचुरा येथून अर्ज भरतील. दासगुप्ता यांना तारकेश्वर, तर प्रामाणिक यांना दिनहाता येथून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या यादीमध्ये यश दासगुप्ता, पायल सरकार, तनुश्री चक्रवर्ती, अंजना बसू या अभिनेते-अभिनेत्रींचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्याचे मतदान ६ एप्रिल, तर चौथ्या टप्प्याचे मतदान १० एप्रिल रोजी आहे.
केरळमधूनदेखील दोन राज्यसभा सदस्यांना तिकीट
दरम्यान, केरळमध्ये भाजपने १४० पैकी ११२ जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. माजी केंद्रीय मंत्री के.जे. अल्फोन्स हे कंजिरापल्ली विधानसभेच्या जागेवरून निवडणूक लढतील. माजी राज्यपाल के. राजशेखरन यांना नेमोन येथून, तर अभिनेते व राज्यसभा सदस्य सुरेश गोपी यांना त्रिचुर येथून तिकीट देण्यात आले आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार व मेट्रोमॅन म्हणून प्रसिद्ध असलेले ई. श्रीधरन हे पलक्कड येथून निवडणूक लढतील.