महिनाभरात आढळले स्क्रब टायफसचे सहा रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 10:22 PM2019-09-24T22:22:01+5:302019-09-24T22:23:56+5:30
स्क्रब टायफसने यावर्षीही नागपूर जिल्ह्यात तोंड वर केले आहे. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात ६ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वातावरणामुळे विविध आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशात स्क्रब टायफसने यावर्षीही जिल्ह्यात तोंड वर केले आहे. सप्टेंबर महिन्यातच जिल्ह्यात ६ स्क्रब टायफसचे रुग्ण आढळले आहेत.
'ओरिएन्शिया सुसुगामुशी' नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा हा आजार आहे. पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळतात. अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे हा आजार होतो. झाडेझुडूप, शेतामधील उंदीर, घुशी, इतर प्राण्यांच्या अंगावर तसेच वाढलेल्या गवतावर स्क्रबचा कीडा आढळून येतो. काही ठिकाणी हिवाळ्यातसुद्धा स्क्रबचे रुग्ण आढळतात. वेळेत औषधोपचार मिळाला नाही तर मृत्यू ओढावतो. नागपूरच्या मेडिकलमध्ये सप्टेंबर महिन्यात ६ रुग्ण जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून दाखल झाले होते. त्यांच्यावर वेळीच योंग्य उपचार करुन त्यांना सुटी देण्यात आली आहे. या आजारामध्ये ताप, डोकेदुखी, अंगदुखी, लिंफ नोड सुजणे, कोरडा खोकला, अंगावर रॅश येणे, न्यूमोनिया, मेंदूज्वरसदृश लक्षणे दिसून येतात. कीडा चावल्याच्या ठिकाणी व्रण दिसतो. रक्ताची चाचणी केल्यानंतरच रोगाचे निदान होते. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. पण साथीच्या वेळी डॉक्टरकडे जाणे आणि वेळेत औषधोपचार, अॅन्टीबायोटिक्स घेतल्याने या रोगापासून बचाव होतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.
प्रतिबंध व उपचार
झाडाझुडपात काम करताना पूर्ण बाह्यांचे पायघोळ कपडे वापरावेत. कपडे, अंथरुण पांघरुणावर कीटकनाशक औषधांचा वापर करावा. घरात आणि बाहेर स्वच्छता पाळावी. डोकेदुखी, मेंदूज्वर, मळमळ, सुस्ती येणे, चालताना तोल जाणे, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.