काटाेलनच्या नगराध्यक्षासह सहा नगरसेवक अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:13 AM2020-12-05T04:13:46+5:302020-12-05T04:13:46+5:30
काटाेल : शहरातील गुंठेवारी प्रकरणात नगराध्यक्ष , पालिका उपाध्यक्ष व गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलांचे नियमबाह्य व ...
काटाेल : शहरातील गुंठेवारी प्रकरणात नगराध्यक्ष , पालिका उपाध्यक्ष व गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलांचे नियमबाह्य व निकृष्ट बांधकाम, त्या बांधकामाच्या निविदा न काढता मर्जीतील लाेकांना कामे दिल्याप्रकरणी या तिघांसह अन्य तीन नगरसेवकांना नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अपात्र ठरविले आहे. दाेन्ही आदेश शुक्रवारी (दि. ४) प्राप्त हाेताच पालिकेच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेता चरणसिंग ठाकूर यांच्यासह सुभाष काेठे, माया शेरकर व हेमराज रेवतकर या तीन नगरसेवकांचा समावेश आहे. शहरातील गुंठेवारीबाबत राधेश्याम बासेवार तर खेळाचे आरक्षित मैदान व शासकीय जाागेवर नियमबाह्य बांधकाम, घरकुलांचे निकृष्ट बांधकामाबाबत राजेश राठी व राधेश्याम बासेवार यांनी नगर विकास मंत्रालयाकडे तक्रार केली हाेती.
या प्रकरणांची चाैकशी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक विशाल तडस यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी चाैकशी अहवाल शासनाला सादर करताच या दाेन्ही प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. यात तक्रारीत करण्यात आलेल्या आराेपांमध्ये सत्यता असल्याचे निदर्शनास आल्याने या गैरव्यवहाराला नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेता चरणसिंग ठाकूर यांच्यासह अन्य तीन नगरसेवकांना जबाबदार धरण्यात आले. त्याअनुषंगाने नगर विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ११ नाेव्हेंबर राेजी व्हीडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे या दाेन्ही प्रकरणांचा निवाडा देत नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांना नगराध्यक्षपदापासून दूर करण्यात आले. चरणसिंग ठाकूर, जितेंद्र तुपकर, सुभाष काेठे, माया शेरकर व हेमराज रेवतकर यांना पाच वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आले.
---
नगर पालिकेचे आर्थिक नुकसान
गुंठेवारीमध्ये ठाेक पद्धतीने रक्कम अदा न करता ती शतमान पद्धतीने प्रदान करण्यात आली. यात पालिकेचे माेठे आर्थिक नुकसान झाले. शहरात पंतप्रधान आवास याेजनेचा ४० काेटी रुपयांचा प्रकल्प राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला हाेता. यात काही दस्तऐवज मागील तारखेत दाखविण्यात आले असून, त्यावर स्थायी समितीच्या दाेन सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नव्हत्या. घरकूल बांधकामाचे अतिरिक्त देयके देण्यात आली. घरकुलांची किंमत दुप्पट दाखविण्यात आल्याने पालिकेचे माेठे आर्थिक नुकसान झाल्याचे या निवाड्यात नमूद केले आहे.