पत्नी, नातेवाईक आणि बँकांना सहा कोटींचा गंडा
By admin | Published: February 19, 2017 02:14 AM2017-02-19T02:14:24+5:302017-02-19T02:14:24+5:30
स्वत:ची पत्नी, नातेवाईक, मित्र तसेच बँका व खासगी फायनान्स कंपन्यांना ६ कोटी १५ लाख रुपयांनी गंडा घालण्याचा आरोप
तदर्थ न्यायालय : रजनिश सिंगचा अटकपूर्व जामीन फेटाळाला
नागपूर : स्वत:ची पत्नी, नातेवाईक, मित्र तसेच बँका व खासगी फायनान्स कंपन्यांना ६ कोटी १५ लाख रुपयांनी गंडा घालण्याचा आरोप असलेल्या आरोपी रजनिश सिंग याचा अटकपूर्व जामीन अर्ज तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
काटोल रोडवरील उत्कर्षनगर येथील रहिवासी सुनीता सिंग या रजनिश सिंग याच्या पत्नी आहेत. त्यांनी १२ नोव्हेंबर २०१६ रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून सदर पोलीस ठाण्यात रजनिशसिंगविरुद्ध भादंविच्या ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
सुनीता आणि रजनिश यांचा विवाह २००३ मध्ये झाला होता. २००४ मध्ये त्यांनी उत्कर्षनगर येथे घर विकत घेतले होते. आता त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.
२००८ मध्ये रजनिशने सुनीता सिंग यांना विश्वासात घेऊन उत्कर्षनगर येथे मॅपल मल्टिसिस्टिम नावाची अॅल्युमिनियम अॅनोडाईज डोअर व विंडो तयार करणारी कंपनी उघडली होती. उत्कर्षनगर येथील घरावर या कंपनीसाठी काटोल मार्गावरील युनियन बँकेतून ३५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पुढे याच घरावर त्याने पत्नीला अंधारात ठेवून एक कोटी रुपयांचे वाढीव कर्ज घेतले होते.
पुढे त्याने कधी मित्रांच्या तर कधी नातेवाईकांच्या बनावट दस्तावेजांवर बँक आणि खासगी वित्त कंपन्यांकडून कर्ज घेऊन फसवेगिरी करण्याचा सपाटाच सुरू केला होता. त्याने मॅपल कंपनीच्या नावे युनियन बँकेतून ५० लाख, एचडीएफसी बँकेतून १० लाख, आयसीआयसीआय बँकेतून ५ लाख, चोला मंडलमकडून ७ लाख ५४ हजार ९६५ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. याशिवाय मित्र नितीन श्रीवास यांची एमआयडीसी वॉटर प्लान्टची यंत्रसामुग्री तारण ठेवून ४८ लाख, विष्णुकुमार ओझा यांची १ कोटी २१ लाख ४७ हजार रुपयांनी, मनोज शेंडे यांची १० लाख, ए. के. पांडे यांची ९ लाख, अमोल झाडे यांची ६० लाख, नवनीत पांडे यांची ७६ लाख, प्रशांत सिंग यांची ५० लाख, अनिल सिंग यांनी ६ लाख ५० हजार, राकेश सिंग यांची १५ लाख आणि दास यांची १० लाख रुपयांनी फसवणूक केली.
न्यायालयात सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील गिरीश दुबे यांनी काम पाहिले. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे तपास अधिकारी आहेत. (प्रतिनिधी)