रस्त्यावर पडला सहा फुटांचा खड्डा
By admin | Published: September 26, 2015 03:00 AM2015-09-26T03:00:32+5:302015-09-26T03:00:32+5:30
पार्डी येथील माता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी अचानक दुपारी विस्फोटासह रस्त्याच्या मधोमध सहा फुटांचा खड्डा पडला आणि त्यातून पाणी बाहेर यायला लागले.
भवानी माता मंदिरच्या प्रवेशद्वारासमोरील घटना : रस्ता फुगला व फुटला
नागपूर : पार्डी येथील माता मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी अचानक दुपारी विस्फोटासह रस्त्याच्या मधोमध सहा फुटांचा खड्डा पडला आणि त्यातून पाणी बाहेर यायला लागले. काही वेळाने पाणी येणे बंद झाले. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. काहींच्या मते पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही लोक या घटनेबाबत उलटसुलट चर्चा करीत आहेत.
ही घटना प्रत्यक्ष अनुभविणारे बाबूलाल हजारीलाल शर्मा म्हणाले, साधारणत: दुपारचे २.३० वाजले होते. प्रवेशद्वारासमोर पानटपरी आणि पंक्चर बनविण्याचे दुकान लागते. त्याचवेळी रस्ता फुगत होता. दुपारची वेळ असल्याने परिसरात शांतता होती. एखाद-दुसरीच व्यक्ती आवागमन करीत होती. अचानक रस्ता फुटला आणि गतीने पाणी बाहेर यायला लागले. माझा पाणीपुरीचा ठेला आहे. ही घटना पाहून मी घाबरलो. तर प्रत्यक्षदर्शी हरीश देशमुख म्हणाले, अचानक विस्फोट झाला आणि खड्डा पडला. खड्ड्यातून गतीने पाणी बाहेर यायला लागले. पाण्यामुळे बाजूला असलेला ठेला उलटला. पंक्चर तयार करणारा त्यावेळी ठेल्याजवळ नव्हता. त्यामुळे कुणालाही इजा झाली नाही.
जोगेश्वर निवासी पवन साहू यांच्या म्हणण्याप्रमाणे रस्त्याच्या मधोमध अचानक खड्डा पडला. जवळपास सहा फुटांचा खड्डा येथे रस्त्याच्या मध्येच पडला आहे. त्यामुळे अपघाताचीही शक्यता वाढली आहे. पोलीस आणि मनपाला यासंदर्भात सूचना देण्यात आली. पण त्याची चौकशी करणे सोडून प्रशासनाने खड्ड्याच्या आजूबाजूला केवळ बॅरिकेट्स लावले आहेत. अद्याप खड्डा दुरुस्तीचे काम करण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)