नागपूरच्या वाठोड्यातील जुगार अड्ड्यावर छापा : १० जुगाऱ्यांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:07 AM2019-10-15T00:07:40+5:302019-10-15T00:09:29+5:30
एका दलालाच्या माध्यमातून वाठोडा पोलिसांसोबत सेटिंग करून सुरू करण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी तेथे पोलिसांना १० जुगारी ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका दलालाच्या माध्यमातून वाठोडा पोलिसांसोबत सेटिंग करून सुरू करण्यात आलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी छापा मारला. यावेळी तेथे पोलिसांना १० जुगारी ताशपत्त्यावर जुगार खेळताना सापडले. त्यांच्याकडून पोलिसांनी रोख रकमेसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी प्रमोद ज्ञानेश्वर कडू (वय २७), सजिद खुर्शिद आलम (वय २४), राम तुलीराम भनारकर (वय २७), कल्पेश पांडुरंग कुंभारे (वय २८), विजय मधुकर महाजन (वय २६), अरशिद अजिज शेख (वय २५), लवकुश विष्णू हेडाऊ (वय ३३), राहुल मोतीराम वाघ (वय २८), नामदेव भगवान बावणे (वय ५२) आणि पंकज वसंतराव कोहाड अशी जुगाऱ्यांची नावे आहेत. हे सर्व वाठोड्यातील प्रमोद कडूच्या घरात रविवारी सायंकाळी ५२ ताशपत्त्यावर जुगार खेळत होते. माहिती कळताच गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी छापा मारून त्यांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून २७,७५० रुपये, ९ मोबाईल आणि दुचाकीसह ४ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा जुगार अड्डा सुरू असून, दोन आठवड्यांपूर्वी एका दलालाने वाठोडा पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून सेटिंग केली होती, अशी चर्चा आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मात्र तेथे छापा मारून हा डाव उधळला.