नागपुरातील सहा मृत्यू उष्माघाताने तर नव्हेत? कारणांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 03:02 PM2022-05-17T15:02:49+5:302022-05-17T15:32:45+5:30
या सहाही व्यक्तींमध्ये पाच व्यक्ती चाळीशीच्या पुढे आहेत. ‘मे हिट’मुळे वाढणारे तापमान याला कारणीभूत आहे की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.
नागपूर : मागील २४ तासांत उपराजधानीत सहा अनोळखी व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली. विशेष म्हणजे हे सहाही लोक शहरातील विविध भागांत रस्ता किंवा फूटपाथवर बेशुद्धावस्थेत आढळले होते. ‘मे हिट’मुळे वाढणारे तापमान याला कारणीभूत आहे की आणखी काही कारण आहे, याचा तपास सुरू आहे.
पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबेनगर एनआयटी मैदानाच्या भिंतीजवळ ६० वर्षांचा अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत आढळल्याने नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी त्याला मेयो इस्पितळात नेले असता त्याचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खामला बाजारात एका कपड्याच्या दुकानासमोर दुपारी सव्वातीनच्या सुमारास ४५ ते ५० वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. पोलिसांनी उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर पावणेदोन तासांनी म्हणजे पाच वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डीगोदाम येथे फूटपाथवर ४५ ते ५० वयोगटांतीलच व्यक्ती निपचित पडलेली आढळून आली. मेयो इस्पितळात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत असल्याचे सांगितले. अर्ध्या तासाने डीआरएम कार्यालयामागील नाल्यात आणखी एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली व त्यालादेखील मृत घोषित करण्यात आले.
सोमवारी पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर येथील भाग्यश्री अपार्टमेंटसमोर ४० ते ४५ वयोगटांतील इसम अशाच प्रकारे बेशुद्धावस्थेत आढळला. तोदेखील मृत झाल्याचे मेयोतील डॉक्टरांनी स्पष्ट केले. सोमवारी दुपारी १२ वाजता पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील अशाच प्रकारे ३० वर्षीय अनोळखी व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली व मेयो इस्पितळात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शहरातील तापमान वाढले आहे. ढगाळ वातावरण व त्यात ४५च्यावर गेलेला पारा यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. त्यातूनच या सहाही व्यक्तींचे मृत्यू झाले का? याची तपासणी सुरू आहे.
चाळीशीपुढील व्यक्तींचे प्रमाण जास्त
या सहाही व्यक्तींमध्ये पाच व्यक्ती चाळीशीच्या पुढे आहेत. सर्वसाधारणत: याच वयोगटातील व्यक्तींना उष्माघाताचा जास्त त्रास जाणवतो. त्यामुळे हे मृत्यूदेखील याच कारणामुळे झालेत का, याची चाचपणी सुरू आहे.