नागपूर येथील बिल्डरला सहा महिन्यांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 09:07 PM2017-12-22T21:07:06+5:302017-12-22T21:09:36+5:30
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने ग्राहकाचा विश्वासघात करणारा हर्षा कन्स्ट्रक्शन फर्मचा पॉवर आॅफ अॅटर्नीधारक धर्मेंद्र बंसीलाल जैनला सहा महिने सश्रम करावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने ग्राहकाचा विश्वासघात करणारा हर्षा कन्स्ट्रक्शन फर्मचा पॉवर आॅफ अॅटर्नीधारक धर्मेंद्र बंसीलाल जैनला सहा महिने सश्रम करावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
याप्रकरणात जैनची पत्नी निधी हीदेखील आरोपी होती. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तिला निर्दोष सोडले आहे. तसेच, जैनला ठोठावलेल्या दंडातील आठ हजार रुपये तक्रारकर्ते ग्राहक संजय रामचंद्र धुमाळ यांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायाधीश डी.ए. तिवारी यांनी हा निर्णय दिला आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, धुमाळ यांनी आरोपींच्या वानाडोंगरी येथील योजनेत फ्लॅट खरेदी केला आहे. धुमाळ यांनी आरोपींना ३६ कोरे धनादेश दिले होते. त्या धनादेशाद्वारे आरोपींनी धुमाळ यांच्या बँक खात्यातून प्रत्येक महिन्यात एक हजार रुपये काढून घेण्याचे ठरले होते. धुमाळ यांच्यासोबत संबंध चांगले असताना आरोपींनी १५ महिन्यांपर्यंत कराराचे पालन केले. संबंध बिघडल्यानंतर आरोपींनी ४ लाख ५० हजार रुपयांचा धनादेश बँकेत सादर केला. तसेच, अन्य एका धनादेशाचाही दुरुपयोग केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे २००३ मध्ये धुमाळ यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. प्रकरणावर १४ वर्षांनंतर निकाल आला.