नागपूर ग्रामीण भागात सहा नवीन पोलीस ठाणे, गुन्हयांवर नियंत्रण आणण्याचे टार्गेट
By योगेश पांडे | Updated: April 9, 2025 18:41 IST2025-04-09T18:40:11+5:302025-04-09T18:41:10+5:30
Nagpur : पोलीस ठाण्यांची संख्या होणार ३१

Six new police stations in Nagpur rural areas, target to control crime
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने पावले उचलली आहे. सरकारने सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांची पायपीट वाचणार असून अनेक रेतीमाफिया तसेच तस्करांवरदेखील चाप लावण्यास मदत मिळणार आहे.
यासंदर्भात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. यासंदर्भातील बैठकीला मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल हेदेखील उपस्थित होते. नागपूर ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ सहकार्य मिळण्यासाठी पोलिस ठाण्यांची गरज होती. त्यादृष्टीने सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार आता नागपूर जिल्ह्यात वडोदा, बाजारगांव, मोहपा, पाचगाव, नांद आणि कान्होलीबारा या सहा ठिकाणी नवीन पोलिस ठाण्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या नवीन पोलिस ठाण्यांमुळे ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्थेला बळकटी मिळेल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना राबवता येणार आहेत. आम्ही या प्रकल्पाला प्राधान्य देत आहोत आणि या प्रक्रियेला वेग देण्यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत. आमचे लक्ष्य हे पोलिस ठाणे लवकरात लवकर कार्यरत करणे आहे, जेणेकरून स्थानिक पातळीवर कायदा सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यांची संख्या होणार ३१
नागपूर ग्रामीण भागात नागपूर सायबर पोलीस ठाणे मिळून एकूण २५ पोलीस ठाणे आहेत. आता सहा नवीन पोलीस ठाण्यांमुळे जिल्ह्यातील एकूण पोलीस ठाण्यांची संख्या ३१ इतकी होईल. नवीन पोलिस ठाण्यांमुळे गावांमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यास मदत व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा आहे.